ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटे (वय 56) यांनी त्यांच्या वारजे येथील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बराटे यांचे वारजे एनडीए रस्त्यावरील एका इमारतीत निवासस्थान होते. त्याच इमारतीत त्यांचे कार्यालयही होते. शुक्रवारी (28 एप्रिल) संध्याकाळी त्यांच्या पत्नी कार्यालयात पोहचल्या असता त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी ही ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून, त्याचे हे विद्यमान अध्यक्ष होते.
बराटे यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी 2007 मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय राहिले नाही.