पुणे / प्रतिनिधी :
कार शोरुममध्ये चोरी करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली असून, चोरटय़ांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात 21 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सावन दवल मोहिते (वय 19), सोनू नागुलाल मोहिते (वय 22), अभिषेक देवराम मोहिते (वय 20), जितू मंगलसिंग बेलदार (वय 23, चौघे रा. बोधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय 19, रा. मुक्ताईनगर, जळगाव), पिंटू देवराम चौहान (वय 19, रा. इंदूर मध्यप्रदेश) अशी अटक चोरटय़ांची नावे आहेत. बिबवेवाडी भागात मध्यरात्री 28 जुलैला देवकी मोटर्स शोरूम फोडून चोरटय़ांनी 4 लाख 96 हजारांची रोकड चोरली होती. कात्रज भागातील दोन मोटार विक्री दालनातून रोकड चोरीचे दोन गुन्हे घडले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरटय़ांचा माग काढण्यासाठी वेगवेगळय़ा भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरटे ज्या वाहनातून पसार झाले होते. ते वाहन जळगावमधील असल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांचे पथक जळगावला रवाना झाले. आरोपी उत्तर भारतात फिरायला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक दिल्ली, मथुरा, हरिद्वार येथे पोहोचले. चोरटे रेल्वेने मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मुंबईतील वांदे भागात सापळा लावून सहाजणांना पकडले.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहोटे, चेतन चव्हाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाउद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अश्रुबा मोराळे, अकबर शेख आदींनी ही कामगिरी केली.
चोरटय़ांची गोव्यात मौजमजा
चोरटय़ांनी 21 जुलैला पुण्यातील मोटार विक्री दालनात चोरी केली होती. मोटारीतून चोरटे मुंबई-बंगळुरू महामार्गाने गोव्याला निघाले. वाटेत कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात मोटार विक्री दालन फोडून चोरी केली. चोरीच्या पैशांवर चोरटय़ांनी गोव्यात मौजमजा केली. गोव्यातून परतताना वेरना पोलीस ठाण्याच्या परिसरातील दोन मोटार विक्री दालने मध्यरात्री फोडून रोकड चोरल्याचे तपासात उघडकीस आले.