प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : शासन व शासकिय अधिकाऱ्यांकडून मराठ्यांना चेपायचेच काम होत आहे.मराठा आंदोलकांवर खोटे आरोप होत असताना शासन व अधिकारी खुलासा करत नाहीत.जेणेकरून मराठा समाजाबाबत चुकीचा समज व्हावा,असा हेतू दिसत आहे. हा मराठ्यांविरोधात चुकीचा प्रकार सुरू आहे.परंतु मराठ्यांच्या मनगटात ताकद असून प्रसंगी मराठ्यांशी दुष्मनी करणाऱ्यांच्या छाताडावर उभे राहू नाचू,असा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथे दिला. यावेळी समन्वयक अॅड.बाबा इंदुलकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत शाब्दिक चकमक होऊन तणाव निर्माण झाला.दरम्यान, या प्रकाराची कालबध्दरीत्या चौकशी करावी,अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
मराठ्यांना ‘ओबीसी’मधून आरक्षण दिल्यास गोंधळ होईल,असे वक्तव्य एका शासकिय अधिकाऱ्याने केल्याचे संदेश समाज माध्यमांवरून प्रसारित झाले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या व्यापक शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन भूमिका मांडली.
एका व्यक्तीने समाजमाध्यमावर जिल्हाधिकारी रेखावार यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास गोंधळ होईल अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये संतप्त भावना असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करावा,अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी मराठा समाजासंदर्भात आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य पेलेले नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या गोपनिय बैठकीतील चर्चा सार्वजनिक करणे अयोग्य आहे.या बैठकीत आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही.याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनाच विचारले तर योग्य होईल.यावर सकल मराठा समाज समन्वयक अॅङ बाबा इंदुलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने आम्ही समाधानी नसल्याचे चढ्या स्वरात सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मी शांतपणे ऐकून घेत असून आवाज वाढवायची गरज नाही,असे सांगितले.यावर तुम्ही जनतेचे नोकर असून जसे आम्ही तुमचे ऐकून घेतले तसे आता तुम्ही आमचे ऐकून घेतले पाहीजे,असे इंदुलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील भ्रष्टाचारासह कोणत्याही प्रश्नावर बोलायला वेळ नाही,असा टोलाही इंदुलकर यांनी लगावला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, मराठ्यांचा दुष्मन कोण आहे, त्याच्या छाताडावर उभे राहून नाचून धडा शिकवू.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा उद्देश ठेवून कोण असे प्रकार करत आहे का? तो नराधम कोण आहे हे समोर आले पाहीजे.
सकल मराठा समन्वयक दिलीप देसाई म्हणाले, एका व्यक्तीने समाज माध्यमांवर पोस्ट करून मराठा व ओबीसीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार केला आहे. त्याच्यावर कारवाई करावी.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी 15 ऑगस्टला मराठा समाजाच्या बैठकीवेळी घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू केल्याचे सांगितले. यावेळी आर. के. पोवार, कमलाकर जगदाळे, बाबा पार्टे, सुनील मोदी, संगीता खाडे, ऊपाराणी निकम, शशिकांत बिडकर, राजू जाधव, दत्ताजी टिपुगडे, महादेव पाटील, अभिजीत बुकशेठ आदी उपस्थित होते.