5 लाखांची फसवणूक
सावंतवाडी : प्रतिनिधी
युट्युबवर सबस्क्राईब वाढवण्याचे काम देतो असे सांगून सावंतवाडीतील सालईवाडा सर्वोदयनगर येथील साईली प्रदीप कोरगावकर या युवतीला पाच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. या संदर्भात या युवतीने येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 19 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 या आठवड्याभराच्या काळात हा प्रकार घडला. कोरगावकर ही युवती एका कंपनीत कामाला आहे. ती घरी असताना तिच्या मोबाईलच्या व्हाट्सअपवर मेसेज आला. त्यात मी यशोदा कंपनीत एच. आर. विभागात कामालाआहे. युट्युब सबस्क्राईब वर वाढवण्याचे काम असून दिवसाला तीन तास पूर्ण केल्यास 150 रुपये तुम्हाला मिळतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दोन लिंक पाठवल्या . त्या लिंक कोरगावकर यांनी ओपन केल्या. तसेच युट्युब सबस्क्राईब करून त्याचे स्क्रीन शॉट त्यांना सेंट केले. त्यानंतर टेलिग्राम अँप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. टेलिग्राम अँप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यांनी कोरगावकर हिला तिसरा टास्क दिला. तिसरा टास्क पूर्ण केल्यानंतर कोरगावकर हीने आपल्या बँक अकाउंटची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तीला प्रिपेड टास्क करण्यास सांगितले. त्यामध्ये तीला पहिले काही टास्क पुर्ण झाल्यावर ते पैसे परत पाठवतील, मात्र रक्कम बदलली जाईल असे सांगून त्यांनी पाठविलेल्या युपीआय आई डी वर आणि बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.त्यानुसार त्यांच्या युपीआय आयडीवर आणि बँक खात्यावर कोरगावकर हीने 5लाख 16 हजार 879 रुपये जमा केले. त्यापैकी केवळ 16 हजार रुपये कोरगावकर हिला परत देण्यात आले. त्यानंतर संबंधितानी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोरगावकर हीने संबंधिता विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी तक्रार नोंद करून घेतली .