सर्वात महाग लाकूड कोणते असेल? आपले उत्तर चंदन किंवा सागवान असे असू शकते. चंदनाचे खोड सात ते आठ हजार रुपये प्रतिकिलो भावाने विकले जाते. तर जुन्या सागवानाची किंमत प्रतिघन फूट 10 ते 12 हजार रुपये असू शकते. अलीकडच्या काळात अत्यंत दुर्मीळ झालेले शिसवीचे लाकूड त्याहीपेक्षा अधिक किमतीचे असू शकते. तथापि, जगात असेही एक लाकूड आहे की ज्याची किंमत प्रतिकिलो 7 ते 8 लाख रुपये आहे. म्हणजेच एक किलो लाकूड विकून आपण एक चांगल्यापैकी कार विकत घेऊ शकता. हे लाकूड आफ्रिकेतील दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये अल्पप्रमाणात उपलब्ध आहे. आफ्रिकेच्या ईशान्येला असणाऱया काही देशांमध्ये त्याची लागवडही केली जाते. त्याला आफ्रिकन ब्लॅकवूड असे म्हणतात. या झाडाची सरासरी उंची 25 ते 40 फूट इतकी असते.
या लाकडाला इतकी किंमत का येते? याचे निश्चित उत्तर सांगता येत नाही. ते कमी प्रमाणात उपलब्ध आहे, हे एक कारण असू शकते. तसेच त्याचा टिकाऊपणा, त्याच्या वस्तू बनविण्यामध्ये असणारी सुलभता, त्याचा काळाभोर रंग, त्यात कोठेही गाठी नसणे, त्याला वाळवी न लागणे किंवा कोणत्याही प्रकारे त्याची झिज कमीत कमी होणे आदी अनेक कारणांमुळे ते इतके महाग आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे ते पाण्यात कितीही काळ राहिले तरी कुजत नाही.
या झाडाची वाढ मात्र हळूहळू होत असल्याने त्याची लागवड कित्येकदा लाभदायक ठरत नाही. त्यामुळे जंगलात आपोआप उगवलेली या लाकडाची झाडे तोडून त्याच्या फळय़ा किंवा तुकडे करून ते विकले जातात. अनेक देशांनी आता त्याची तोड अत्यंत मर्यादित केलेली आहे. हे झाड पूर्ण वाढण्यासाठी 100 वर्षांचा कालावधी लागतो. लाकडाची वैशिष्टय़े त्याच्यात पूर्णपणे निर्माण होण्यासाठी ते लवकर तोडून चालत नाही. म्हणूनच ते इतके महाग आहे.