मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. गडकरी : न्यायाधीश निवास उभारण्याच्या जागेला कंपाउंड करण्याची सुचना : न्यायालय नवीन इमारत, न्यायाधीश निवासस्थानाबाबत मुंबईत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलविली बैठक
प्रतिनिधी/इचलकरंजी
शहरातील अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या नियोजित नवीन इमारतीचा आराखडा नवी मुंबई न्यायालयाच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या बहुमजली इमारतीच्या धर्तीवर तयार करण्याबाबतची सुचनेबरोबर न्यायाधिशाच्याकरीता उभारण्यात येणाऱया निवासस्थानच्या जागेला त्वरीत कंपाउंड भिंत घालण्याबाबतच्या सुचना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ए.एस.गडकरी यांनी शनिवारी केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश गडकरी शहरामधील अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाची नवीन उभारण्यात येणाऱ्या नियोजित जागेची व न्यायाधिश निवासस्थाने उभारण्यात येणाऱया नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश गडकरी यांनी सुचना केल्या. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश एस.सी.चांडक, इचलकरंजी अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. नेरलेकर, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. महेबूब बाणदार, उपाअध्यक्ष ऍड. अमित सिंग, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. शिवराज चुडमुंगे, उपाध्यक्ष ऍड. आदी उपस्थितीत होते.
राजवाड्य़ानजीक असलेल्या अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयात सध्या दहा न्यायाधिशांची न्यायालये आहेत. सध्या उपलब्ध असलेली न्यायालय इमारत न्यायालयासाठी कमी पडत आहे. त्यामुळे नवीन न्यायालय इमारतीची मागणी गेल्या काही वर्षापासून महानगरपालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीचा विचार करुन महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीची महासत्ता चौकालगतची 4 एकर 27 गुंठे जागा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी दिली. या न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्र्याच्या टेबलवर पडून आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने शहरातील रुगे मळ्यात 68 गुंठे जागा न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी राखून ठेवलेल्या या दोन जागेची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गडकरी यांनी केली.
याचदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गडकरी व जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चांडक, इचलकरंजी अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधिश नेरलेकर यांनी इचलकरंजी बारला भेट दिली. त्यावेळी त्यांचा इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशन आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
न्यायालय इमारतीबाबत मुख्यमंत्र्यानी बोलविली बैठक
शहरात उभारण्यात येणाऱ्या अप्पर जिल्हा व अपर सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या आणि न्यायाधिश निवासस्थानाबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी मुंबईत बैठक बोलविली आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. चुडमुंगे आणि उपाध्यक्ष ऍड. लटके यांनी दिली.