पुणे / वार्ताहर :
यूट्युबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीची स्वत:च घरी प्रसुती करीत नवजात बालकास इमारतीच्या पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक बाब पुण्यातील उत्तमनगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेत संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना सांगितले आहे.
उत्तमनगर पोलिसांना रविवारी रात्री कोंढवे धवडे परिसरात एक नवजात अर्भक एका सोसायटीच्या आवारात बेवारस स्थितीत आढळले होते. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. याबाबतची माहिती अशी : संबंधित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईसह ती घराजवळील एका खासगी दवाखान्यात काही महिन्यांपूर्वी गेली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला ती गर्भवती असल्याची शक्यता लक्षात घेऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु मुलीने व तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून मुलीस घरी परत आणले होते. घराशेजारी राहणाऱ्या लोकांपासूनदेखील ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कोणास कळू नये, याकरिता मुलीने आणि तिच्या पालकांनी यू टय़ूबवर व्हिडिओ पाहून स्वत:च मुलीची प्रसुती केली. त्यानंतर मुलीच्या आईने सदर नवजात बाळ सोसायटीच्या पार्किंगमध्ये आडबाजूला एका झाडाजवळ सोडून दिले.
नवजात बालक ससून रुग्णालयात दाखल
दरम्यान, सोसायटीच्या आवारात कुत्रे भुंकत असल्याने रहिवाशांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केल्यावर त्यांना नवजात अर्भक आढळले. त्यांनी ही बाब पोलिसांनी सांगितली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नवजात बाळास ताब्यात घेऊन त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच सोसायटीत एक रुग्णवाहिका मुलीची आई बेशुद्ध झाल्याने तिला घेण्यासाठी आल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत.