भारत-द.आफ्रिका महिला हॉकी लढतीतील एक क्षण.
वृत्तसंस्था/ केपटाऊन
सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱया सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 7-0 असा दणदणीत पराभव केला.
अलीकडेच झालेल्या एफआयएच नेशन्स कप हॉकी स्पर्धेत मिळविलेल्या यशाने प्रोत्साहित झालेल्या भारतीय महिला संघाने येथेही उत्कृष्ट फॉर्म दाखविला. पहिला सामना त्यांनी 5-1 असा जिंकला तर दुसऱया सामन्यातही त्यांनी हाच फॉर्म कायम राखत मोठा विजय मिळविला. उदिताने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. दुसऱया सत्रात भारताने यजमानांवरील आक्रमक चढाया करीत दडपण वाढविले.
पहिल्या सामन्यात वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या वैष्णवी विठ्ठल फाळकेने 22 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. अनुभवी राणी रामपालने शानदार मैदानी गोल नोंदवत ही आघाडी 3-0 अशी केली आणि दुसरे सत्र संपण्याच्या सुमारास भारताने ही आघाडी 6-0 अशी केली. संगीता कुमारी, नवनीत कौर, वंदना कटारिया यांनी अनुक्रमे 25, 26 व 27 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले. भारताच्या आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकेचा बचाव खिळखिळा झाल्याचे दिसून आले. 58 व्या मिनिटाला वंदना कटारियाने वैयक्तिक दुसरा व संघाचा सातवा गोल नोंदवून एकतर्फी विजय निश्चित केला.