ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम ः ब्रिटनच्यो रॅडुकानूचे आव्हान समाप्त, पेगुलाचीही आगेकूच
वृत्तसंस्था/ मेलबर्न
जखमी अवस्थेत खेळणाऱया विद्यमान विजेत्या राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱया फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जेतेपद स्वतःकडेच राखत 23 वे ग्रँडस्लॅम पटकावण्याचे त्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. याशिवाय इटलीचा यानिक सिनर, पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची कोको गॉफ व जेसिका पेगुला यांनी तिसऱया फेरीत स्थान मिळवले. ब्रिटनच्या रॅडुकानूचे आव्हान मात्र दुसऱया फेरीत संपुष्टात आले.
अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डने नदालवर 6-4, 6-4, 7-5 असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. नदालने दुसऱया सेटवेळी पायाचे स्नायू आखडल्याने मेडिकल टाईमआऊट घेतले होते. उपचारानंतर पुन्हा परतल्यावर त्याला नेहमीसारखा खेळ करता आला नाही. 2016 मध्ये तो या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. त्यानंतर ग्रँडस्लॅममध्ये एकदाही तो इतक्या लवकर स्पर्धेबाहेर पडला नव्हता.
इटलीच्या 15 व्या मानांकित यानिक सिनरने शानदार प्रदर्शन करीत सलग दुसरा सामना सरळ सेट्सनी जिंकला. त्याने अर्जेन्टिनाच्या टॉमस मार्टिनचा एचेव्हेरीचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.
महिला एकेरीत जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने 84 व्या मानांकित कॅमिला ओसोरिओचा 6-2, 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. सुमारे दीड तास ही लढत चालली होती. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने तिसरी फेरी गाठताना ऍलियाक्सांड्रा सॅसनोविचचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. पाच महिन्यात दुसऱयांदा तिने सॅसनोविचला हरविले आहे.
अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफने ब्रिटनच्या 20 वर्षीय एम्मा रॅडुकानूचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आणले. दोन वेळा ती तिसऱया सेटवर जाणार होती. पण तिने स्वतःला सावरत दुसऱया सेटमध्येच सामना संपवला. तिने ही लढत 6-3, 7-6 (7-4) अशी जिंकत आगेकूच केली. 2020 नंतर 18 वर्षीय गॉफने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले आहे. रॅडुकानूला मात्र येथे दुसऱया फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. तिने 2021 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. ती सध्या घोटय़ाच्या दुखापतीतूनही जात आहे.