A person on a two-wheeler is seriously injured after being hit by a car
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी – धुरी टेंबनगर येथील घटना
कुडाळ – मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी – धुरी टेंबनगर (साई मंदिर समोर) दुभाजाकावरून क्रॉसिंग करण्यासाठी अचानक वळविलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल ला गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या किया कारची जोराची धडक बसली.यात मोटारसायकलच्या मागे बसलेले अशोक श्रीधर काराई ( 62 , रा.नेरूर – वाघोसेवाडी ) गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी बाबोळी – गोवा येथे हलविण्यात आले. मोटारसायकल स्वार दीपक अशोक काराई ( 23, रा.नेरूर – वाघोसेवाडी) याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची खबर सुजय विठ्ठल प्रभुदेसाई ( रा.फोंडा – गोवा ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. श्री प्रभुदेसाई आज सकाळी फोंडा – गोवा येथून आपल्या ताब्यातील किया कार घेऊन जानवली- कणकवली येथे जाण्यासाठी निघाले.दरम्यान मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दीपक काराई आपल्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर घेऊन पिंगुळी – वडगणेश मंदिर येथून कुडाळच्या दिशेने येत होता.त्याच्या मोटारसायकलच्या मागे त्याचे वडील अशोक काराई बसले होते. पिंगुळी – साई मंदिर समोर दीपक ने महामार्ग क्रॉसिंगसाठी आपल्या ताब्यातील मोटारसायकल अचानक दुभाजकाच्या दिशेने वळविली आणि पाठीमागून येणाऱ्या श्री प्रभुदेसाई यांच्या ताब्यातील कारची जोराची धडक त्याच्या मोटारसायकलला बसली.
सावंतवाडी / प्रतिनिधी