विशेष पुरस्कारासाठी पती करतात मोठी मेहनत
जगाच्या अनेक हिस्स्यांमध्ये अजब परंपरांचे पालन केले जाते. काही परंपरा या समुदाय किंवा धर्माशी निगडित असतात. तर काही परंपरा या केवळ मजेपोटी पाळल्या जातात. फिनलंडमधील एका परंपरेत पती स्वतःच्या पत्नीला पाठीवर उचलून घेत शर्यत पूर्ण करतो, या शर्यतीत जिंकणाऱया जोडप्याला विशेष पुरस्कार देण्यात येतो.
फिनलंडमध्ये वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार यंदा ही स्पर्धा 1 जुलै रोजी फिनलंडच्या सोनकाजार्वी भागात आयोजित होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांमध्ये याचे आयोजन होऊ शकले नव्हते. तर त्यापूर्वी झालेल्या स्पर्धेत जगभरातून सुमारे 80 जोडपी सामील झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणाऱया जोडप्यांना हेल्मेट अन् कंबरेवर बेल्ट लावावा लागतो. पत्नीला स्वतःच्या पाठीवर उचलून घेण्याबद्दल कुठलाच नियम नाही, कशाही प्रकारे पाठीवर घेत धावावे लागते. पत्नीला पाठीवर उलट टांगून घेण्याची पद्धत अनेक स्पर्धकांकडून वापरली जाते, यात पती पत्नीचे दोन्ह पाय पकडून धावत असतो.
या स्पर्धेत सामील होण्यासाठी पतीचे वय 17 वर्षांपेक्षा अधिक असावे आणि किमान 49 किलो वजन असणे आवश्यक आहे. पत्नी त्याच्यापेक्षा वजनाने कमी असल्यास तिच्यावर वजन बांधले जाते, जेणेकरून तिचे वजन 49 किलोपर्यंत वाढेल. या शर्यतीत विजयी होणाऱया पतीला पत्नीच्या वजनाइतकी बियर इनाम म्हणून मिळते.
अशाप्रकारची शर्यत आता फिनलंडबाहेर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांमध्येही आयोजित होऊ लागली आहे. या शर्यतीचे पहिले आयोजन 1992 मध्ये झाले होते, परंतु 17 व्या शतकादरम्यान एका टोळीचे पुरुष दुसऱया टोळीतील महिलांचे अपहरण करताना त्यांना पाठीवर उचलून घेत जात होते, ही शर्यत याच प्रथेच्या आधारावर सुरू झाल्याचे लोकांचे मानणे आहे.