लाखोंच्या संख्येत आहेत चाहते
व्हिक्टोरिया सॅल्सेडोचे नाव मॉडेलिंगच्या जगतात गाजत आहे. 26 वर्षीय या युवतीला दोन्ही हात तसेच एक पाय नाही, तरीही ती मॉडेलिंगसारख्या शो बिझनेसमध्ये नाव कमावत आहे, या क्षेत्रात लुक्ससाठी कित्येक शस्त्रक्रिया करवून घेण्याचा प्रकार चालत असताना ही युवती स्वतःच्या शारीरिक व्यंगासह जगभरात स्वतःचे लाखो चाहते निर्माण करू शकली आहे.
माणसाने स्वतःमधील त्रुटींवरून रडत राहण्याऐवजी यश मिळवून देणारा मार्ग शोधावा असा संदेश ही युवती देत आहे. ज्या स्थितीत लोक जगणंच सोडून देऊ पाहतात अशा स्थितीत व्हिक्टोरियाने हिंमत न हारता मोठे यश मिळविले आहे. व्हिक्टोरिया सॅल्सेडो जन्मजात दिव्यांग नव्हती. वयाच्या 6 वर्षी तिच्यासोबत एक दुर्घटना घडली, ज्यात तिचे दोन्ही हात आणि एक पाय गमावले गेले. तिने चुकून विजेच्या वाहिनीला स्पर्श केला होता, यात तिचे शरीर जळाले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिचे दोन्ही हात आणि एक पाय कापला होता.
इक्वेडोरची रहिवासी असलेली 26 वर्षीय व्हिक्टोरियाने 20 वर्षे दोन्ही हात अन् एक पायाशिवाय काढली आहेत. मी एक एन्फ्लुएंसर होईन असा विचारच कधी केला नव्हता असे ती सांगते. सद्यकाळात सोशल मीडियावर तिचे 1 लाख 70 हजार फॉलोअर्स आहेत.
मी माझे जीवन सामान्यपणे जगू इच्छित होते, वयाच्या 19 व्या वर्षी एका मॉडेलिंग स्काउटने मला पाहिले होते, त्या मॉडेलिंग क्षेत्रातून मला ऑफर्स येऊ लागल्याचे व्हिक्टोरियाने सांगितले आहे. व्हिक्टोरिया अत्यंत सुंदर असण्यासह प्रोफेशनल देखील आहे. तिने स्वतःच्या सौंदर्याला एक वेगळा आयाम मिळवून दिला आहे.
2021 मध्ये व्हिक्टोरियाने मिस इक्वेडोर ब्यूट पेजेंटमध्ये भाग घेतला होता. अशाप्रकारे मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू पाहत होते असे ती सांगते. व्हिक्टोरिया केवळ स्वतःच्या एका पायाच्या मदतीने स्वतःची सर्व कामे करते. तसेच स्वतःच्या प्रोस्थेटिक पायाच्या मदतीने वर्कआउटही करते. स्वतःचे व्हिडिओ आणि जीवनाद्वारे लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचा तिचा प्रयत्न आहे.