बालिका आदर्श-अंगडी इंटरनॅशनल स्कूल विजयी
बेळगाव / प्रतिनिधी
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदेमातरम्’ आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतून राष्ट्रस्फूर्तीचा जयघोष करण्यात आला. या स्पर्धेमध्ये टिळकवाडी विभागातून बालिका आदर्श विद्यालय तर शहर विभागातून अंगडी इंटरनॅशनल स्कूलनी प्रथम क्रमांक पटकाविला. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किरण ठाकुर म्हणाले, वंदेमातरम् स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची बिजे रुजणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असल्यामुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तिन्ही राज्यांमध्ये वंदेमातरम् स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोसायटीचे संचालक पंढरी परब, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, माजी संचालक अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सहभागी शाळांना मानचिन्ह तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नितीन कपिलेश्वरी, जगदीश कुंटे, किरण जोरापूर यांनी केले. समन्वयक विनायक जाधव यांनी स्पर्धेचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.
स्पर्धेमध्ये टिळकवाडी विभागातून प्रथम बालिका आदर्श विद्यालय, द्वितीय एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, तृतीय ज्ञान प्रबोधन मंदिर, शहर विभागातून प्रथम अंगडी इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय मराठी विद्यानिकेतन व भरतेश सेंट्रल स्कूल हलगा, तृतीय महिला विद्यालय मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.