तेलंगणातील आमदार ः भाजपमधून निलंबित ः वादग्रस्त वक्तव्य भोवले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वादग्रस्त टिप्पणीवरून तेलंगणाच्या गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. भाजपने आमदार टी. राजा यांना निलंबित करत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षनेतृत्वाने आमदाराला 10 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. टी. राजा सिंह यांच्या या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी सोशल मीडियावर टीका देखील होत आहे, तर दुसरीकडे काही जण समर्थन देखील करत आहेत. त्यांचे समर्थक आमदाराच्या सुटकेची मागणी करत आहे.
20 ऑगस्ट रोजी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादच्या माधापुरमध्ये शो आयोजित झाला होता. परंतु त्यापूर्वी भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी फारुकीला हा शो न करण्याचा इशारा दिला होता. आयोजनस्थळ पेटवून देण्याचे आणि फारुकीला मारहाण करण्याची धमकी दिली होती. यामुळे खबरदारीदाखल टी. राजा सिंह यांना ताब्यात घेण्यात आले होते. याचबरोबर मुनव्वर फारुकीच्या शोमध्ये पोहोचलेल्या किमान 50 जणांनाही ताब्यात घेण्यात आल्यावर कॉमेडियनचा कार्यक्रम शांततेत पार पडला होता.
मुनव्वर फारुकीने स्वतःच्या शोमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान केला होता आणि याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हेही नोंद झाले आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री के.टे. रामारामव यांच्याकडून फारुकीला शोसाठी निमंत्रित करण्यात आल्याने टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेतला होता. यापूर्वी कर्नाटकात पोलिसांनी फारुकीच्या शोला अनुमती देण्यास नकार दिला होता.
भाजप आमदाराने फारुकीवर टीका करणारा एक व्हिडिओ सोमवारी जारी केला होता. या व्हिडिओत आमदाराने कथितपणे एका विशिष्ट धर्माच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या टिप्पणीनंतर भाजप नेत्याला अटक करण्याची मागणी करत काही लोकांनी सोमवारी रात्री हैदराबादमध्ये निदर्शने केली होती. एआयएमआयएमचे आमदार आणि ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या नगरसेवकांनी पोलीस स्थानकात पोहोचून राजा सिंह विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.
दबीरपूर पोलिसांनी राजा सिंह यांच्या विरोधात भादंविच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोदविल्यावर अटकेची कारवाई केली आहे. ज्या सोशल मीडिया साइटवर मी व्हिडिओ प्रसारित केला होता, त्या साइटने हा व्हिडिओ हटविला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर या व्हिडिओ क्लिपचा दुसरा हिस्सा अपलोड करणार आहे. हे मी धर्मासाठी करत आहे. धर्मासाठी मरणही पत्करण्यास तयार असल्याचे टी. राजा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.