22 हजारांहून अधिक खटले निकालात
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. शनिवारी ही लोकअदालत भरविण्यात आली. यामध्ये हजारो खटले निकालात काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या खटल्यांची संख्या जमविण्याचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढण्यात आले तरी याबाबतची संपूर्ण माहिती सोमवारी प्रसिद्ध केली जाईल, असे जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.
तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. यामध्ये प्रलंबित खटले निकालात काढले जातात. चेकबॉन्स, कौटुंबिक, फौजदारी, नुकसानभरपाई यासह इतर खटले निकालात काढले जातात. त्यानुसार शनिवारी अनेक खटले निकालात काढले. कौटुंबिक न्यायालयामध्ये अनेक खटले समेट करण्यात आले आहेत. प्रत्येक न्यायालयामध्ये पक्षकाराला व त्यांच्या वकिलांना समोर घेऊनच हे खटले निकालात काढण्यात आले.
शनिवारी जवळपास 40 हजार खटले निकालात काढण्यासाठी घेण्यात आले होते. त्यामधील 22 हजारांहून अधिक खटले निकालात काढण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढण्यात आले असून देवघेवही करण्यात आली आहे. सोमवारी एकूण खटल्यांच्या निकालांची आकडेवारी स्पष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.