बाकनूर येथील सागर सावंत याचे भक्तिगीत स्पर्धांमध्ये यश
वार्ताहर/ किणये
विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि भजनात एक वेगळीच ऊर्जा, ताकद आहे. विठ्ठलाच्या भजनात लहान बालकांपासून ते वयोवृद्ध सारेजण रमून जातात. विठ्ठल भक्तीत तल्लीन होतात. अशाच पद्धतीने एका बारा वर्षाच्या बालकाला विठ्ठलाच्या अभंगाची गोडी लागली आहे.
बाकनूर येथील सागर अनिल कदम हा बालक विठूनामाच्या भजनामध्ये दंग होऊ लागला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात होणाऱया विविध स्पर्धांमध्ये तो आपली कला सादर करून यश संपादन करीत आहे. त्यामुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे.
गोल्याळी, खानापूर, कर्ले या ठिकाणी झालेल्या भजन स्पर्धांमध्ये त्याने आपल्या गावातील भजनी मंडळातून सहभाग घेतला होता. नुकत्याच बेळगुंदी येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
सागर हा बाकनूर येथील प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी असून सहावीमध्ये शिकत आहे. भजनाबरोबरच तो रोज नियमित अभ्यासही करतो. शाळेत अभ्यासात हुशार असल्याचे त्याचे शिक्षक सांगतात. भजनाच्या स्पर्धेवेळी तो वारकऱयाची वेशभूषा परिधान करतो.