कट, मारेकरी अन् सूत्रधाराचा होणार पर्दाफाश
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येमागील अनेक गोष्टींचा अद्याप उलगडा जगासमोर झालेला नाही. आता राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित एक वेबसीरिज तयार होत असून ती अनिरुद्ध मित्रा यांचे पुस्तक ‘नाइनटी डेज’वर आधारित आहे.
राजीव गांधी यांच्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक ‘नाइनटी डेज ः द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असॅस्सिन’वर आधारित ही वेबसीरिज अप्लॉज एंटरटेन्मेंट सादर करणार आहे. नागेश कुकुनूर यांच्या दिग्दर्शनात ही वेबसीरिज तयार होणार आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर घडलेल्या घटनांवर आधारित या वेबसीरिजसाठी अप्लॉज एंटरटेन्मेंट, आदित्य बिर्ला समुहाने हातमिळवणी केली आहे. या सीरिजकरता अनिरुद्ध मित्रा यांच्या पुस्तकाचे हक्क प्राप्त करण्यात आले ओत. माजी पत्रकार मित्रा हे चौकशीबद्दल वृत्तांकन करणारे आणि मारेकऱयांच्या शोधादरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे करणाऱयांपैकी एक होते. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने कशाप्रकारे हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला आणि सूत्रधारावर कारवाई केली हे या सीरिजमध्ये दर्शविण्यात येणार आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येसंबंधीची कहाणी सीरिजमध्ये गुंफण्यासाठी उत्सुक असल्याचे कुकुनूर यांनी म्हटले आहे. मी माझ्या पुस्तकाद्वारे भारतात सुरू करण्यात आलेल्या सर्वात मोठय़ा मॅनहंटची सर्वात ठोस माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मित्रा यांनी नमूद केले आहे.