विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रदर्शनात रंगीबेरंगी आकाश कंदील
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटी, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टतर्फे आकाश कंदील स्पर्धा व प्रदर्शनाला रविवारी हेरवाडकर स्कूलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. व्यासपीठावर बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे चेअरमन किरण ठाकुर, जगदीश कुंटे, ज्ञानेश कलघटगी, बिंबा नाडकर्णी, दर्शन चौधरी उपस्थित होते.
प्रारंभी किरण ठाकुर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेतली जात आहे. त्यामुळे बालकांच्या कलागुणांना लहानपणापासूनच वाव मिळत आहे. शिवाय व्यावसायिक कौशल्य वाढीसाठी हा उपक्रम मुलांना उपयुक्त ठरत आहे.
या प्रदर्शनात हेरवाडकर स्कूल, ठळकवाडी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, शानभाग स्कूल, भंडारी स्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील प्रदर्शनात मांडले होते. यंदा या आकाश कंदील प्रदर्शनाला आणि स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाय पर्यावरणपूरक आकाश कंदील प्रदर्शनात पाहायला मिळाले.
पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांना खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रंगीबेरंगी आकाश कंदील, पणत्या आणि दिव्यांची विक्री होणार आहे. याप्रसंगी सुनील कुसाने, लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव, सुभाष देसाई, छत्रू पाटील यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.