प्रभारी अरुण सिंग यांचे स्पष्टीकरण : भाजप नेत्यांची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असू शकतात आणि ते असावेत. मात्र, मनभेद नाहीत. जे काही मनभेद आहेत ते काँग्रेसमध्ये आहेत, असा टोला भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी रविवारी हाणला.
अरुण सिंग रविवारी बेळगाव दौऱयावर आले होते. सरकारी विश्रामधाम येथे त्यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशची सत्तासूत्रेही आपल्याच पक्षाच्या हाती येणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व बसवराज बोम्माई सरकार शेतकऱयांचे, गरिबांचे, महिलांचे सरकार आहे. भाजपच्या जनसंकल्प यात्रेला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे पक्षाचे प्रभावी नेते आहेत, असे सांगतानाच माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ हे आपले नेते नाहीत. कोअर कमिटीतही नाहीत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
रमेश जारकीहोळी यांच्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, राज्यात पक्षाची सत्ता आणण्यासाठी ते नेतृत्व करणार आहेत, असे अरुण सिंग यांनी सांगितले. बैठकीत काय झाले, याविषयीची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. यावेळी पालकमंत्री गोविंद कार्जोळ, अध्यक्ष संजय पाटील, ऍड. एम. बी. जिरली आदींसह अनेक नेते उपस्थित होते.