मोहम्मद शिया अल-सुदानी आता नवे पंतप्रधान
बगदाद / वृत्तसंस्था
इराकमध्ये कुर्दिश नेते अब्दुल लतीफ रशीद यांची देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत रशीद यांना 160 हून अधिक मते मिळाली, तर देशाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष बरहम सालेह यांना केवळ 99 खासदारांनी मतदान केले. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष रशीद यांनी मोहम्मद शिया अल-सुदानी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. इराकी राज्यघटनेनुसार, सार्वत्रिक निवडणुकीनंतर खासदारांनी प्रथम राष्ट्राध्यक्ष निवडणे आणि नंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान सुदानी हे सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी यांची जागा घेतील. ते 2020 पासून पंतप्रधान पदावर होते. 52 वषीय सुदानी यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या एका वर्षानंतर इराकमध्ये सरकार स्थापनेवरील गतिरोध संपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अडचण दूर करण्याच्या दिशेने राष्ट्राध्यक्षपदाची निवड हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. इराकमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसोबत पंतप्रधानांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राजधानीच्या सर्वात सुरक्षित भागात ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ल्यामुळे संसदेचे कामकाज लांबणीवर पडले. गुरुवारी संसदेच्या अधिवेशनापूर्वी राजधानी बगदादमधील सर्वात सुरक्षित क्षेत्र असलेल्या ग्रीन झोनवर अनेक रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यात किमान 10 जण जखमी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. रॉकेट हल्ल्यामुळे संसदेचे कामकाज उशिरा सुरू झाले, मात्र संसदेचे अधिवेशन तहकूब झाले नाही.