सेन्सेक्स 684 अंकांनी तेजीत ः निफ्टी 171 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीची नेंद करत बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाच्या दरम्यान इन्फोसिस आणि बँक यांच्या समभागांच्या झालेल्या लिलावामुळे बाजारात मजबूत स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 684.64 अंकांनी मजबूत होत 1.20 टक्क्यांसोबत निर्देशांक 57,919.97 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 171.35 अंकांसोबत निर्देशांक 17,185.70 अंकांवर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी मजबूत राहिला, यासोबतच एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., एचसीएल टेक, लार्सन ऍण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या सत्रात महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो भारती एअरटेल आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
प्रमुख घडामोडींमध्ये देशातील दुसऱया नंबरची असणारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस यांना चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीत नफा जवळपास 11 टक्क्यांनी वाढून तो 6,021 कोटी रुपयाच्या घरात राहिल्याची नोंद केली आहे, तर कंपनीने 9,300 कोटी रुपयांच्या किमतीच्या समभागांच्या पुनर्खरेदीची घोषणाही केली आहे. याच घटनेचा भारतीय भांडवली बाजारांवर सकारात्मक प्रभाव झाला. यामुळे याचा लाभ बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांना झाला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद झाले आहेत.