एक ठार तर एक गंभीर जखमी
प्रतिनिधी /पणजी
कंपाल येथे जीप व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून ती गोमेकॉत उपचार घेत आहे. अपघाताबाबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि जीप चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीप चालकाचे नाव अमन असे आहे. अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव मारूती सावंत (69) असे असून महिलेचे नाव पुष्पा सावंत असे आहे. अपघाताची घटना रविवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली आहे.
जीए-07-1111 क्रमांकाची जीप पणजीहून मिरामारच्या दिशेने वेगाने जात होती. जीए-08-एएम-3648 क्रमांकाची दुचाकी पणजीच्या दिशेने येत होती. कंपाल येथे दोन्ही वाहने पोचताच त्यांच्यात अपघात झाला. दुचाकीस्वार मारूती तसेच त्यांची पत्नी पुष्पा गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वारीत गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. गोमेकॉत उपचार घेत असताना मारूती सावंत यांचे निधन झाले. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.