कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे पूलानजीक दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले.सायमन थॉमस राॅड्रिक्स (50 ,रा. कुडाळ) व अमित दिलिप जोशी (35 , रा.बिबवणे नाईकवाडी,मूळ वेंगुर्ले – भटवाडी ) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी – गोवा येथे हलविण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. अमित जोशी यांच्या ताब्यातील मोटारसायकल व.सायमन राॅड्रिक्स यांच्या ताब्यातील मोटारसायकल मध्ये हा अपघात झाला. दोन्हीं मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. पिंगुळी येथील व्यावसायिक व मनसे माजी उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ओमनीतून कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ.फड व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सायमन राॅड्रिक्स यांना नातेवाईकांनी ,तर अमित जोशीयांना त्याचे आई वडील व बिबवणेचे माजी उपसरपंच अविनाश लोके यानी बांबोळी – गोवा येथील रुग्णालयात हलविले. कुडाळचे पोलीस हवालदार के एम. परुळेकर व प्रतिक सुभेदार यानी घटनास्थळी पंचनामा केला.