ऑनलाईन टीम/तरुण भारत
बीड जिल्ह्यातील पाटोदा मांजरसुभा रोडवरील पाटोळ्याजवळ स्विफ्ट कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौरे ( कुटे ) कुटुंबामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा-मांजरसुभा रोडवरील पाटोद्याजवळ बादमळे वस्ती येथे हा अपघात झाला. घटनास्थळी पाटोदा पोलिस व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले असून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. हा अपघात जेव्हा झाला त्यावेळी कार आणि टेम्पोच्या धडकेचा मोठा आवाज झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर रस्त्यावरील इतर वाहनधारकांनी अपघातातील जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान, बामदळे वस्ती जवळ कारमधील चौरे ( कुटे) परिवार लग्नासाठी केजकडे जात होते. पाटोदा मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ कार (स्विफ्ट डिजायर) क्रमांक (एम.एच.१२के.एन ९७६१) व आयशर टेम्पोचा (क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५) अपघात झाला. आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये स्विफ्ट अडकलेली होती. गाडीमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
राज्यात अपघातवार :
रविवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. विनायक मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.