पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सुखरुप
प्रतिनिधी /बेळगाव
निडसोशी (ता. हुक्केरी) येथील सिद्धसंस्थान मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या कारला अपघात झाला असून या अपघातातून महास्वामीजी सुखरुप बचावले आहेत. त्यांच्यावर केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार करण्यात आले.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तेगूरजवळ बुधवारी ही घटना घडली आहे. महास्वामीजी कारमधून हुबळीहून बेळगावला येत होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याशेजारी कार उलटली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. एअरबॅगमुळे महास्वामीजी सुखरुप बचावले.
सरळवास्तूचे चंद्रशेखर गुरुजींचा मंगळवारी भीषण खून झाला. बुधवारी हुबळीजवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारात भाग घेण्यासाठी स्वामीजी हुबळीला गेले होते. कारचालक रमेश माळीसह आणखी दोघेजण कारमध्ये होते. मात्र सर्वजण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती बेळगाव, निडसोशी, संकेश्वर, हुक्केरी भागात समजताच तेथील भक्तांनी बेळगावकडे धाव घेतली. हुक्केरी हिरेमठाचे चंदशेखर शिवाचार्य स्वामीजी, माजी खासदार रमेश कत्तीसह अनेक नेत्यांनी स्वामीजींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
मी सुखरुप : महास्वामीजी
या अपघातात माझ्यासह कारमध्ये असलेल्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. आपल्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून मी रात्रीच निडसोशी मठात पोहोचलो आहे, अशी माहिती महास्वामीजींनी दिली.