युक्रेनच्या अध्यक्षांचा जगाला इशारा ः रशियाच्या आण्विक हल्ल्यासाठी तयार रहा
रशिया आणि युपेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. याचदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी जगाला रशियाच्या आण्विक हल्ल्यावरून सतर्क केले आहे. जगाने रशियाच्या अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराच्या दिशेने तयार राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्याचा निर्णय घेईपर्यंत जगाने प्रतीक्षा करू नये. या आण्विक हल्ल्याकरता पूर्वीपासूनच तयारी करावी लागणार आहे. पुतीन कुठल्याही अस्त्राचा वापर करू शकतात याची मला पूर्ण खात्री आहे. अँटी रेडिएशन मेडिसीन आणि हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी निवारा केंद्रांची आवश्यकता भासणार असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
जगाने पुतीन यांच्या धोक्याबद्दल चिंता करणे गरजेचे असल्याचा इशारा झेलेंस्की यांनी यापूर्वी दिला होता. तर रशियाने 24 फेब्रुवारी रोजी हल्ला सुरू केल्यावर त्वरित स्वतःच्या आण्विक दलांना हायअलर्टवर ठेवले होते. पुतीन यांनी स्वतःच्या सैन्याला न्युक्लियर वॉर ड्रील करण्याचा आदेशही दिला होता. रशियाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाल्यास आम्ही युक्रेनवर अण्वस्त्राने हल्ला करू असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितले होते.
युक्रेन युद्धात पदरी पडलेली निराशा पाहून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे कमी पल्ल्याचे आणि कमी तीव्रतेच्या अण्वस्त्रांची मदत घेऊ शकतात असे सीआयएचे संचालक विलियम बर्न्स यांचे म्हणणे आहे. तर युक्रेन विरोधी युद्धात अपेक्षित यश न मिळाल्याने रशियाच्या महासत्तेच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अशा स्थितीत ही प्रतिमा कायम राखण्यासाठी रशिया युक्रेनविरोधात अण्वस्त्रs वापरू शकतो असे तज्ञांचे मानणे आहे.
रशियन सैनिक बिथरले
मोस्कवा युद्धनौकेने जलसमाधी घेतल्यावर रशियाचे सैनिक बिथरले आहेत. अशा स्थितीत युक्रेनचा सूड उगविण्यासाठी कीव्ह, खारकीव्ह समवेत 8 शहरांमध्ये रशियाने हल्ले तीव्र केले आहेत. तर रशियाचे एक क्षेपणास्त्र डागणारी युद्धनौका काळय़ा समुद्रात बुडाली आहे.