इमारतीला धडकली तिची कार
हॉलिवूड अभिनेत्री ऐनी हेचे हिची कार आगीच्या तावडीत सापडल्याने ती होरपळली आहे. अभिनेत्री कार एका इमारतीला धडकली आहे. या इमारतीला आग लागली होती. या दुर्घटनेत ऐनी गंभीर स्वरुपात होरपळली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. लॉस एंजिलिसच्या मार विस्टा येथील वालग्रोव्ह एव्हेन्यूत एका इमारतीला आग लागी होती आणि हेचे हिची कार या आगीच्या तावडीत सापडली.
कारमध्ये आढळून आलेल्या ऐनीला गंभीर स्थितीत एलएएफडी पॅरामेडिक्सकडून रुग्णालयात नेण्यात आल्याचे स्थानिक अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना 65 मिनिटांचा कालावधी लागला. कारमधील महिलेला वाचविण्यात आले, परंतु ती गंभीर स्वरुपात होरपळली आहे. अन्य कुणी या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती नसल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
वॉलग्रोव्ह ऍव्हेन्यूत आग लागण्याच्या घटनेच्या काही मिनिटांपूर्वी हेचे हिची कार दुर्घटनाग्रस्त झाली होती. हेचे हिची कार प्रथम एका अपार्टमेंट परिसरात गॅरेजला धडकली होती. परिसरात राहणाऱया लोकांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने कार रिव्हर्स घेत तेथून जाण्याचा प्रयत्न केला आणि ही कार आग लागलेल्या इमारतीला जाऊन धडकली होती.
ऐनी हिने ‘वोल्कॅनो’, ‘सिक्स डेज सेव्हन नाइट्स’, ‘डॉनी ब्रास्को’, ‘आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर’ समवेत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ऐनी हेचे ही 90 च्या दशकातील हॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती.