वीजभारित तारेच्या स्पर्शाने झाला मृत्यू : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांचा पुढाकार
वार्ताहर /किणये
बिजगर्णी येथील शिवारात रताळी पिकांवर औषध फवारणी करीत असताना विद्युतभारित तार अचानक तुटून पडल्यामुळे तारेच्या स्पर्शाने अमित उर्फ अहमद देसाई व लता देसाई हे दाम्पत्य सहा ऑगस्ट रोजी जागीच ठार झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला. सदर दाम्पत्याला दीड वर्षाची मुलगी आहे. तिही अनाथ झाल्यामुळे हेस्कॉम व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून त्या दांपत्याच्या वारसदारांना धनादेश देऊन प्रशासनाने आधार दिला आहे. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिजगर्णी गावाला भेट देऊन विद्युत तारेच्या स्पर्शाने बळी गेलेल्या ‘त्या’ दाम्पत्याच्या कुटुंबीयांना आधार देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कुटुंबीयांना मदत केली..
पतीला वाचविताना पत्नीचाही मृत्यू
दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी अमित व लता हे पती-पत्नी गावाजवळील रताळी पिकांवर औषध फवारणी करीत होते. शिवारातून गेलेली विद्युत तार अचानक तुटून अमित यांच्या अंगावर पडली. यावेळी ते जागीच ठार झाले. पतीला तारेचा स्पर्श झालेला पाहून पत्नीही त्या ठिकाणी धावत गेली आणि पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचाही तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला.
आर्थिक मदतीच्या उद्देशानेच धनादेश
मुलगीला व कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी. या उद्देशाने सदर धनादेश देण्यात आला आहे. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, युवराज कदम, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, सदस्य, हेस्कॉमचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कुटुंब व गावकऱ्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार मानले आहे.