पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश प्राधिकरणातर्फे (एनटीए) 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे आले आहे. एनटीएच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार असून, देशभरातील 497 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांकाचा वापर करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. ‘नीट’ परीक्षा होणाऱ्या परीक्षा केंद्रांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी एनटीएकडे परीक्षा केंद्र आणि शहर बदलण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे.
आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रात बदल केला जाणार नाही. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे नियोजन करण्याची सूचना एनटीएने केली. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंदर्भात अडचणींसाठी 011-40759000 या क्रमांकावर किंवा neet@nta.ac.in या ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.
हेही वाचा : कोरोनाचे निदान आता अवघ्या 20 सेकंदात