क्रीडा वर्तुळातून होतय अभिनंदन
सिंधुदुर्ग
गोवा येथे आजपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या क्रीडा प्रकारासाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक ॲड. विक्रम भांगले यांच्यावर ‘स्पर्धा प्रबंधक या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’ दिल्ली ने नुकतीच याची घोषणा केली आहे.
भारताला सर्वाधिक ऑलम्पिक आणि जागतिक पदक मिळवून देणाऱ्या शुटींग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात ॲड. विक्रम भांगले यांचे नाव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ,आयोजक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ओळखले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच अनेक जागतिक नेमबाजी स्पर्धा, कॉमनवेल्थ एशियन आशियायी व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धामध्ये त्यांनी पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या आजपर्यंतच्या उत्तम कामगिरीची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत दिल्ली येथील नॅशनल रायफल असोसिएशन ने गोवा येथे सुरु होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारीच ॲड. भांगलेंकडे सोपविली आहे. देशपातळीवर होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्पर्धा प्रबंधक’ ही जबाबदारी मिळणे हा एक फार मोठा सन्मान समजला जातो. केवळ ही एकच जबाबदारी नव्हे तर या स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजक समितीने ‘डायरेक्टर ऑफ कॉम्पिटीशन ही आणखीन एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.ॲड भांगले हे गोवा राज्य नेमबाजी संघाचे सचिव तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे मानद सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण क्रीडा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.