स्मरणशक्ती होतेय कमजोर, मोठेपणी अनेक मनोविकार होण्याची भीती
आर्टिफिशियल स्वीटनर हे साखरपेक्षा अनेक पटीने गोड असते. परंतु याच्या सातत्याने होणाऱया वापरामुळे आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो. विशेषकरून मुलांमध्ये याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. युएफसी डोर्नसाइफच्या एका अध्ययनात आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केल्याने मुलांची स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे.
तसेच या मुलांमध्ये अन्य मानसिक बदलही दिसून येतात. किशोरावस्थेत अधिक स्वीटनरचे सेवन केल्यास याचा प्रभाव युवावस्थेपर्यंत दिसू लागतो. आर्टिफिशियल स्वीटनर थेट पचनप्रणालीला प्रभावित करत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. यामुळे मधूमेहाचा धोका वाढत असतो.
उंदरांवर झाले संशोधन
आर्टिफिशियल स्वीटनरचा काही उंदरांवर प्रयोग करण्यात आला. त्यांना आर्टिफिशियल स्वीटनर पाण्यात मिसळून देण्यात आले. काही उंदरांना सामान्य पाणी देण्यात आले. त्यानंतर उंदीर प्रौढ झाल्यावर त्यांच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या. स्वीटनरचे नियमित सेवन करणारे उंदीर स्वतःचा मार्ग चुकत असल्याचे आणि त्यांची स्मरणशक्ती कमजोर असल्याचे आढळून आले. हे उंदीर कुठलीही गोष्ट लवकर विसरत होते असे प्रमुख संशोधक प्राध्यापक लिंडसे शियर यांनी सांगितले आहे.
स्वीटनरचे सेवन करणाऱया उंदरांमध्ये ग्लूकोज रक्तात वेगळय़ा प्रकारे वाहून आतडय़ापर्यंत पोहोचत होते असे संशोधकांना दिसून आले आहे. मुलांनी कमी वयापासून आर्टिफिशियल स्वीटनरचे नियमित सेवन करू नये. शक्यतो याचा वापर टाळण्यात यावा असे अध्ययनाचे सह-लेखक प्राध्यापक स्कॉट कानोस्की यांनी म्हटले आहे.
आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करणाऱया लोकांच्या जीभेवर गोड चव अनुभव करणाऱया रिसेप्टर्सना नुकसान पोहोचते. यामुळे लोकांच्या चवीच्या शक्तीला धक्का पोहोचतो. यामुळे गोठ चव अनुभव करण्यासाठी चहा, कॉफी किंवा अन्य गोष्टींमध्ये अधिक साखरेचा वापर करावा लागू शकतो.