अमेरिकेतून 34 दिवसांमध्ये पोहोचला भारतात
दीर्घ अंतराच्या रोड ट्रिपवर जाणारा व्यक्ती अखेर कुठपर्यंत जाऊ शकतो, एका शहरातून दुसऱया शहरात, एका राज्यातून दुसऱया राज्यात किंवा फार तर देशाच्या एका टोकाकडून दुसऱया टोकापर्यंत. परंतु पंजाबमधील एका व्यक्तीने अमेरिकेतून भारतात येण्यासाठी कारने प्रवास केला आहे.
पंजाबच्या जालंधर येथे राहणारे लखविंदर सिंह यांनी स्वतःच्या कारने रोड ट्रिपद्वारे अमेरिकेहून जालंधरपर्यंत प्रवास केला आहे. लखविंदर हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील सॅक्रामेंटो शहरात राहतात आणि तेथे त्यांचा व्यवसाय आहे. स्वतःच्या गावी वाहनानेच जाण्याचा निश्चय त्यांनी केला होता. लखविंदर सिंह यांनी 34 दिवसांमध्ये 20 देशांचे भ्रमण केले आणि 20 हजार किलोमीटरचा प्रवास करत भारतात प्रवेश केला आहे. या प्रवासात अनेक देशांमधील लोकांना ते भेटले ओत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून बाहेर पडल्यावर लखविंदर हे सुमारे दीड महिन्यांनी जालंधरमध्ये पोहोचले आहेत.
सर्वप्रथम त्यांनी अमेरिकेतून ब्रिटनपर्यंतचा प्रवास सागरी जहाजाद्वारे केला आणि स्वतःची कार जहाजातून अन्य देशात नेली आहे. त्यांनी ब्रिटनमध्ये त्यांनी रोड ट्रिप सुरू केली आणि ही ट्रिप भारतात समाप्त झाली.
अमेरिकेतून ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीत्झर्लंड, हंगेरी, तुर्किये, इराण आणि पाकिस्तान मार्गे लखविंदर भारतात पोहोचले आहेत. इराणमधील अनुभव काहीसा वेगळा होता, कारण तेथे अमेरिकन कार चालविण्याची अनुमती नव्हती. याचमुळे तेथे कार टॅक्सीसोबत बांधून आणावी लागली. पाकिस्तानात प्रेमळ वागणूक मिळाल्याचे लखविंदर यांनी सांगितले आहे.
युरोपचे देश खूपच छोटे आहेत, तेथे काही काळातच देश ओलांडता येतो. पाकिस्तानात मी एकूण 14 दिवस घालविले आणि या 14 दिवसांमध्ये अनेक ठिकाणांना भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.