प्रतिकात्मक हातोडा मुरुड ग्रामपंचायतीकडे सुपूर्द, साई रिसॉर्टची लांबूनच पाहणी करून मुंबईकडे रवाना
प्रतिनिधी/ दापोली
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कारवाईच्या ठोस आश्वासनानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टविरुद्ध शनिवारी आरंभलेले आंदोलन स्थगित केले.प्रशासनाच्या उत्तराने आपले समाधान झाले असून आपण सोबत आणलेला प्रतिकात्मक हातोडा मुरुड ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय साई रिसॉर्टची लांबूनच पाहणी करून ते मुंबईकडे रवाना झाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकाऱयांना मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर सोमय्या यांनी शनिवारी दापोलीकडे कूच केले. शनिवारी सकाळी ते ठाणे येथून रेल्वेने खेड येथे दाखल झाले. तेथून ते गाडीने मुरुड येथे दाखल झाले आणि तेथील तलाठी कार्यालय गाठले. यावेळी तेथे उपस्थित उपविभागीय अधिकाऱयांनी अनिल परब यांना प्रशासनाकडून सुरू असणाऱया कारवाईबाबत माहिती दिली.
यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सदर रिसॉर्ट पाडण्याबाबत होणाऱया खर्चाची तरतूद महाराष्ट्र शासनाने कालच केली आहे. शिवाय प्रशासन आता हे रिसॉर्ट पाडण्यासाठी एजन्सी नेमणार आहे. यानंतर रिसॉर्ट पाडण्यात येईल. महिनाभरात ही सर्व कारवाई होईल असे आश्वासन आपल्याला प्रशासनाकडून मिळाले आहे. यामुळे आपले समाधान झाले आहे. आपण साई रिसॉर्ट पाडण्यासाठी आणलेला प्रतिकात्मक हातोडा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करत असल्याचे सांगितले. शिवाय पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल या रिसॉर्टला जो दंड आकारण्यात आला आहे त्या दंडाची वसुलीदेखील प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. पोलिसांनी सी कोंस या रिसॉर्टच्या विरोधात एफआरआय दाखल केले आहे. मात्र साई रिसॉर्टच्या मालकांविरुद्ध एफआरआय दाखल केलेले नाही. तो त्यांनी करावा, असेदेखील सोमय्या म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी अनिल परब यांचे मालक म्हणून थेट नाव घेण्याचे टाळले.
त्याचबरोबर दापोली कोर्टात भारत सरकारच्यावतीने साई रिसॉर्टविरोधात जो खटला चालू आहे त्यावर केवळ तारीख पे तारीख मिळत असल्याबाबतदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने या रिसॉर्टवर कारवाई होऊ शकत नसल्याचे सरकारला कळवले होते. मात्र याप्रकरणी केवळ एनएला स्थगिती आहे, सीआरझेडला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते व आपण या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने आपली चूक मान्य केल्याचे सोमय्या यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच स्थानिकांना आश्वासन देताना केवळ अनिल परब यांचे बांधकाम सीआरझेडमध्ये होते. बाकीच्यांचे बांधकाम हे सीआरझेडमध्ये नाही. त्यांनी जर तसे केले असेल तर त्यांनी अर्ज करून सदर बांधकाम नियमित करून घ्यावे, असा सल्लादेखील त्यांनी स्थानिक रिसॉर्ट मालकांना दिला.
यानंतर किरीट सोमय्या हे थेट साई रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र तेथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. तसेच साई रिसॉर्टच्या पुढे पोलिसांनी बॅरीकेट्सची उभारणी केली होती. त्यामुळे सोमय्या यांना प्रत्यक्ष साई रिसॉर्टपर्यंत पोहचता आले नाही. त्यामुळे त्यांनी लांबूनच साई रिसॉर्टची पाहणी करून पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या अचानक ठरलेल्या दौऱयामुळे पोलिसांची व प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
सोमय्यांना यावेळी विरोध नाही! किरीट सोमय्या यांनी गेल्यावेळी जेव्हा दापोली दौरा केला होता तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादीच्यावतीने त्यांना कडाडून विरोध करण्यात आला होता. बसस्थानकाबाहेर राष्ट्रवादी व शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच प्रतिकात्मक मुंडन करून त्यांची अंत्ययात्रादेखील काढण्यात आली होती. मात्र शनिवारी झालेल्या सोमय्या यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शिवसेना व राष्ट्रवादीकडून कोणत्याहीप्रकारचा विरोध करण्यात आला नाही. त्यांच्या विरोधात एकही कार्यकर्ता रस्त्यावर उतरला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.