माजी मंत्री शिरीन मजारी यांचा आरोप ः कतारमध्ये भेट झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर सध्या वेगळाच आरोप होत आहे. कतारची राजधानी दोहा येथील विमानतळावर एका विमानात इस्रायलच्या काही अधिकाऱयांची भेट त्यांनी घेतली असल्याचा आरोप माजी मंत्री शिरीन मजारी यांनी केला आहे. तसेच त्यांनी विदेश मंत्रालय तसेच शाहबाज यांच्याकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.
इस्रायलला अद्याप मान्यता न देणाऱया निवडक देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. इस्रायलला मान्यता देण्यासाठी आपल्यावर मोठा दबाव टाकला जात असल्याचा दावा इम्रान खान यांनी पंतप्रधानपदी असताना केला होता.
पंतप्रधान शाहबाज शरीफ हे मंगळवारी दोहा येथे पोहोचले होते. त्यांच्या विमानाच्या शेजारी इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचे विमान काही तासांनी येऊन उभे राहिले. मोसादचे मोहिमेसाठी वापरले जाणारे हे विशेष विमान होते. दोहा विमानतळावर सुमारे 9 तासांपर्यंत हे विमान ठाण मांडून होते. शाहबाज किंवा त्यांच्या अधिकाऱयांनी मोसादच्या अधिकाऱयांची विमानात गुप्त भेट घेतली असल्याचा दावा मजारी यांनी केला आहे.
इस्रायलच्या स्थापनेला 70 हून अधिक वर्षे झाली आहेत, परंतु पॅलेस्टाइन वादामुळे आतापर्यंत अनेक मुस्लीम देशांनी त्याला मान्यता दिलेली नाही. पॅलेस्टाइनसोबत एकजुटता दाखविण्यासाठी पाकिस्तान अन् सौदी अरेबियाने अद्याप इस्रायलला मान्यता दिलेली नाही. इस्रायलची उपस्थिती असलेल्या कुठल्याही व्यासपीठावर या दोन्ही देशांचा सहभाग नसतो.