यजमान इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाची पहिली वनडे लढत आज
होव / वृत्तसंस्था
टी-20 क्रिकेट प्रकारात सर्वसाधारण प्रदर्शनामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघासमोर आता यजमान इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत त्याची भरपाई करण्याचे आव्हान असेल. आपली शेवटची मालिका खेळत असलेल्या अनुभवी झुलन गोस्वामीला थाटात निरोप देणे, हे देखील संघाचे लक्ष्य असणार आहे. आज उभय संघातील ही पहिली वनडे भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे.
यापूर्वी 1-2 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले, त्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला विशेषतः फलंदाजी व क्षेत्ररक्षणात घोर निराशा पत्करावी लागली. वास्तविक, दुखापतग्रस्त कर्णधार हिदर नाईट गैरहजर असल्याने याचा लाभ घेण्याची नामी संधी भारताकडे होती. पण, मध्यफळीतील समस्या जैसे थे राहिल्या आणि याची भारताला पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली. दयालन हेमलताला आजमावून पाहण्यात आले. मात्र, ती फारसा प्रभावी खेळ साकारु शकली नाही.
जेमिमा रॉड्रिग्यूजचा संघात समावेश करण्यात आला असला तरी तिच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता कायम आहे. यापूर्वी द हंड्रेड स्पर्धेत ती दुखापतग्रस्त झाली होती. टी-20 संघातून वगळल्या गेलेल्या यास्तिका भाटियाला आता वनडे संघातील स्थान कायम राखण्यासाठी झगडावे लागेल. स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर नेहमीप्रमाणे फलंदाजीतील मोठी भिस्त असणार आहे. शफाली वर्माला सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर झुलन गोस्वामी निवृत्त झाल्यानंतर जलद गोलंदाजीच्या आघाडीवर भारताला बरेच झगडावे लागू शकते, असे सध्याचे चित्र आहे. रेणुका सिंगने अगदी अलीकडे बऱयापैकी कामगिरी केली असली तरी संघाला अगदी विदेशात देखील अद्याप फिरकी गोलंदाजांवरच अधिक अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.
पूजा वस्त्रकार, स्नेह राणा व दीप्ती शर्मा यांनी मेरिटवर संघात स्थान मिळवले असले तरी प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन अष्टपैलू, मात्र एकही स्पेशालिस्ट नसणे परवडणार का, हा कळीचा प्रश्न आहे. ही मालिका आयसीसी वनडे महिला चॅम्पियनशिपचा एक भाग असून याच माध्यमातून 2025 वर्ल्डकपचे क्वॉलिफायर्स देखील ठरणार आहेत. त्यामुळे देखील ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची असेल.
संभाव्य संघ
भारत ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, सब्बिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, रेणुका ठाकुर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, जेमिमा रॉड्रिग्यूज.
इंग्लंड ः ऍमी जोस्न, टॅमी बीमाऊंट, लॉरेन बेल, माईया बॉशियर, ऍलाईस कॅप्से, केट क्रॉस, प्रेया डेव्हिस, ऍलाईस डेव्हिडसन-रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी इक्लेस्टोन, प्रेया केम्प, इस्सी वाँग, डॅनी वॅट.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.
थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.
भारत-इंग्लंड महिला संघातील वनडे मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
18 सप्टेंबर / पहिली वनडे / दु. 3.30 वा. / होव
21 सप्टेंबर / दुसरी वनडे / सायं. 6 वा. / कॅन्टर्बरी
24 सप्टेंबर / तिसरी वनडे / दु. 3.30 वा. / लॉर्ड्स
इंग्लिश महिला संघात ऍलाईस कॅप्से, प्रेया केम्पला संधी
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंडने ऍलाईस कॅप्से व प्रेया केम्प यांना संघात पाचारण केले असून ऍमी जोन्सकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवली गेली आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिप सायकलमधील या पहिल्या स्पर्धेत हिदर नाईट, नॅट स्किव्हर खेळू शकणार नाहीत. उपकर्णधारपदाची जबाबदारी सोफी इक्लेस्टोनकडे सोपवण्यात आले आहे.
कॅप्से व केम्प यांनी अलीकडेच संपन्न झालेल्या टी-20 मालिकेत उत्तम प्रदर्शन साकारले. कॅप्सेने टी-20 मालिकेपूर्वी महिला गटातील द हंड्रेड स्पर्धेतही लक्षवेधी योगदान दिले. केम्पने यापूर्वी भारताविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात अर्धशतक झळकावले होते.
‘भारताविरुद्ध टी-20 मालिकेत आमच्या खेळाडूंनी सांघिक खेळ साकारला, त्याचा सार्थ अभिमान आहे. आमचे बहुतांशी खेळाडू नवे आहेत. पण, तरीही कोणत्याही आघाडीवर ते कमी पडले नाहीत. कौशल्य व सातत्य या दोन्ही आघाडय़ांवर ते सरस ठरले. ऍमीने कर्णधार म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली. तिला सोफीची उत्तम साथ लाभली. आता वनडे मालिकेतही आम्हाला असेच सातत्य अपेक्षित आहे’, असे इंग्लिश महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक लिसा केटली यांनी नमूद केले.