ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठीच महायुतीमध्ये आले आहेत. पण त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री शिंदेंची खुर्ची बळकावायला सुरूवात केली आहे. मंत्रालयातील वॉर रूमदेखील त्यांनी ताब्यात घेतली आहे, असं म्हणत खा. विनायक राऊत यांनी शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
हिंगोलीत उद्या उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभास्थळावरील तयारीची पाहणी करण्यासाठी विनायक राऊत आले होते. त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्री होणार का, असा सवाल माध्यमांनी त्यांना केला. त्यावेळी ते म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठीच युतीत गेलेत, पण त्यांनी आतापासूनच मुख्यमंत्री शिंदे यांची खुर्ची बळकवायला सुरुवात केली आहे. मंत्रालयातील वॉर रूम त्यांनी ताब्यात घेतली आहे, असं म्हणत त्यांनी उजव्या हाताचा ठेंगा दाखवला.
हिंगोली शहरात रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आला आहे. तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर’, अशा शब्दांनी टीझरची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठय़ा संख्येने उपस्थित रहा, असं आवाहनही टीझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.