लखनौ / वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या वाहनताफ्याला उत्तर प्रदेशातील हरदोई येथे शुक्रवारी अपघात झाला. शुक्रवारी दुपारी हरदोई येथे पोहोचलेल्या सपा अध्यक्षांच्या ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या अपघातात सुमारे सात वाहनांचे नुकसान झाले असून काहीजण जखमीही झाले आहेत. अखिलेश यादव हरपालपूर भागातील बैथापूर येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर धडकली. या प्रकरणाची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.