कन्नड चित्रपटाचा हिंदी रिमेक
बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने सैफ अली खान आणि तब्बू यांचा चित्रपट ‘जवानी जानेमन’मधून पदार्पण केले होते. अलाया आता स्वतःचा आगामी चित्रपट ‘यू-टर्न’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला आहे. आता अलायाने चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे.
‘या यू-टर्नवरून मागे हटायचे नाही, स्वतःच्या जोखिमीवर पुढे जात रहा! हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे’ असे अलायाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. यू-टर्न चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी सादर केला जाणार आहे. तर पोस्टरमध्ये जखमी अवस्थेत अलाया दिसून येत आहे.
एकता कपूरच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेला हा चित्रपट झी5 वर 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरिफ खान यांनी केले आहे. यू-टर्न हा कन्नड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यू-टर्न हा मूळ चित्रपट कन्नड भाषेत 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा साईनाथने मुख्य भूमिका साकारली होती. मग या चित्रपटाचा मल्याळी रिमेक ‘केयरफुल’ नावाने 2017 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 2018 मध्ये तमिळ अन् तेलगू भाषेतील रिमेक प्रदर्शित झाला होता, ज्यात सामंथा अक्किनेनीने मुख्य भूमिका साकारली होती. आता याच्या हिंदी रिमेकद्वारे अलाया स्वतःची अभिनयक्षमता सिद्ध करणार का हे पहावे लागणार आहे.