वृत्तसंस्था/ मियामी
येथे सुरु असलेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अलकॅरेझने तसेच महिलांच्या विभागात बिनाका अँड्रेस्क्यु व साबालेंका यांनी आपले शानदार विजय नोंदवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात 19 वर्षीय अलकॅरेझने सर्बियाच्या लेजोव्हिकचा 6-0, 7-6 (7-5) असा पराभव केला. गेल्याच आठवड्यात अलकॅरेझने रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव करत इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 6-4, डेन्मार्कच्या रुनेने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात बेलारुसच्या साबालेंकाने बोझकोव्हाचा 6-1, 6-2 तसेच बिनाका अँड्रेस्क्युने अमेरिकेच्या केनिनचा 6-4, 6-4, रशियाच्या अॅलेक्सोंड्रोव्हाने स्वीसच्या बेनसिकचा 7-6 (10-8), 6-3, ग्रेचेव्हाने पोलंडच्या फ्रेचचा 6-1, 6-2, क्विटोव्हाने व्हेकिकचा 6-4, 7-6 (7-3), क्रेसिकोव्हाने मॅडिसन किजचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले.