टार्गेट किलिंगच्या घटनांची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ राजौरी
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीआरपीएफसोबत मिळून राजौरीतील कालाकोटमध्ये ग्राम रक्षा गार्ड्सना (व्हीडीजी) विशेष शस्त्र प्रशिक्षण दिले आहे. या विशेष मोहिमेदरम्यान कालाकोटमध्ये जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या सदस्यांसमवेत 300 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कालाकोट येथील तातापानी, ब्रोह, सियालसुई, पोथा आणि सोलकी यासारख्या क्षेत्रांमधील गावांमध्ये याकरता अभियान राबविण्यात आले.
जानेवारी महिन्यात झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनंतर व्हिलेज डिफेन्स गार्ड पुन्हा सक्रीय झाले आहेत. जानेवारीमध्ये 948 जणांना सुरक्षा दलांकडून शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पूर्वी येथील स्थिती गंभीर झाली होती, लोक देखील घाबरले होते, अनेक लोकांनी स्थलांतराचे पाऊल उचलले होते. अशा स्थितीत शस्त्र प्रशिक्षण एक चांगला पुढाकार आहे. शस्त्र कशाप्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आल्याचे व्हीडीजी सदस्य मनशाद अली यांनी सांगितले आहे.
सीआरपीएफने प्रत्येक गावात जात लोकांना शस्त्रांचे प्रशिक्षण द्यावे अशी आमची इच्छा आहे. आमच्या महिलांना देखील शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जावे असे व्हीडीजीचे अन्य सदस्य गुलजार अहमद यांनी म्हटले आहे.
व्हिलेज डिफेन्स कमिटी
1990 च्या दशकात जम्मू-काश्मीर प्रशासनाने पर्वतीय भागांमध्ये वाढते दहशतवादी हल्ले पाहता ग्राम सुरक्षा समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांच्या माध्यमातून लोकांना स्वतःचे आणि स्वकीयांचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या समितीत स्थानिक लोकांना भरती करत त्यांना शस्त्रास्त्रs पुरविण्यात आली होती. दहशतवादी हल्ले थांबल्यावर या सदस्यांकडून शस्त्रास्त्रs परत घेण्यात आली होती. अलिकडेच व्हीडीसी म्हणजेच ग्राम रक्षा समितीचे नाव बदलून ग्राम रक्षा गार्ड करण्यात आले आहे.