अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : सिनेर, रुबलेव्ह, जेसिका पेगुला, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
स्पेनचा युवा टेनिसपटू तिसऱया मानांकित कार्लोस अल्कारेझने पाच सेट्सच्या रोमांचक लढतीत यानिक सिनेरवर मात करून अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचे आव्हान संपुष्टात आणत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची दोघांचीही पहिलीच वेळ आहे. महिलांमध्ये आर्यना साबालेन्का व पोलंडची अग्रमानांकित इगा स्वायटेक यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले तर जेसिका पेगुला व कॅरोलिना प्लिस्कोव्हा पराभूत झाल्या.
स्पेनच्या 19 वर्षीय अल्कारेझने 21 वर्षीय सिनेरवर 6-3, 6-7 (7-9), 6-7 (0-7), 7-5, 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. तब्बल पाच तास 15 मिनिटे ही लढत रंगली होती. स्थानिक वेळेनुसार रात्री 2.50 वाजता हा सामना पूर्ण झाला. यापूर्वी 1993, 2012, 2014 मध्ये सर्वात उशिरा संपलेले तीनही सामने रात्री 2.26 वाजता पूर्ण झाले होते. हा विक्रम अल्कारेझ-सिनेर लढतीने मागे टाकला. या सामन्यात पहिला सेट अल्कारेझने जिंकला. पण नंतरचे दोन्ही टायब्रेकरपर्यंत लांबलेले सेट्स सिनेरने जिंकून चौथ्या सेटमध्ये मॅचपॉईंटपर्यंत मजल मारली होती. पण अल्कारेझने हा मॅचपॉईंट वाचवत नंतर हा सेटही जिंकला आणि निर्णायक सेटमध्ये शानदार प्रदर्शन करीत अल्कारेझने सामना जिंकून आगेकूच केली. सामना जिंकल्यानंतर कोर्टमध्ये पाठीवर पडत त्याने आनंद साजरा केला. त्याला आता पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याची तसेच जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ‘मी हे कसे साध्य केले, हे मलाच अजून समजत नाहीय. माझा खेळ व सामना अतिशय उच्च दर्जाचा होता. एक अविश्वसनीय विजय मिळविल्याचा आनंद होतोय,’ अशा भावना अल्कारेझने व्यक्त करताना चाहत्यांचेही आभार मानले. उपांत्य फेरीत अल्कारेझची लढत फ्रान्सेस टायफोशी होईल.
टायफोची रुबलेव्हवर मात
अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या 22 व्या मानांकित टायफोने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा 7-6 (7-3), 7-6 (7-0), 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. दोन तास 36 मिनिटे रंगलेली ही लढत टायफोने 17 व्या बिनतोड सर्व्हिसवर संपवली. टायफोला ही स्पर्धा जिंकणारा ऑर्थर ऍशनंतर पहिला आफ्रिकन-अमेरिकन टेनिसपटू होण्याची संधी आहे. ऍशने 1968 मध्ये असा पराक्रम केला होता. 24 वर्षीय टायफोने या स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार प्रदर्शन केले असून हा सामनाही त्याला अपवाद नव्हता. चौथ्या फेरीत त्याने संभाव्य विजेत्या राफेल नदालचे आव्हान संपुष्टात आणले होते. ‘आधीच्या फेरीत कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला होता. आंदे रुबलेव्ह हा जबरदस्त खेळाडू असून त्याच्याविरुद्ध असा आणखी एक मोठा विजय मिळविता आला, हे अविश्वसनीय आहे. बाजू उलटवणे खूपच कठीण होते, पण मी ते करू शकलो आणि उपांत्य फेरीत पोचू शकलो,’ असे टायफो म्हणाला.
स्वायटेकची आगेकूच
महिला एकेरीत अग्रमानांकित पोलंडच्या 21 वर्षीय इगा स्वायटेकने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने ही लढत 6-3, 7-6 (7-4) अशी जिंकली. प्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविलेल्या स्वायटेकची उपांत्य लढत आर्यना साबालेन्काविरुद्ध होईल.
या वर्षात फॉर्ममध्ये असलेल्या बेलारुसच्या साबालेन्काने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान 6-1, 7-6 (7-4) असे संपुष्टात आणत सलग दुसऱया वर्षी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या वर्षातील तिसऱया ग्रँडस्लॅममध्ये तिने शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षी या दोघींत झालेल्या दोन लढतीत साबालेन्काला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विम्बल्डन व माँट्रियल उपांत्य फेरीत प्लिस्कोव्हाने तिला हरविले होते. मात्र यावेळी ती जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने तिने प्लिस्कोव्हाला हॅट्ट्रिकची संधी दिली नाही.