वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या मियामी खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सीडेड कार्लोस अलकॅरेझ तसेच अमेरिकेचा टेलर फ्रिज आणि महिलांच्या विभागात बिनाका अँड्रेस्क्यूने एकेरीची तिसरी फेरी गाठली.
स्पेनच्या अलकॅरेझने दुसऱ्या फेरीतील सामन्यात बॅग्नीसचा 6-0, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. सर्बियाचा जोकोविच या स्पर्धेत सहभागी झाला नसल्याने अलकॅरेझने एटीपीच्या ताज्या मानांकनात मिळविलेले अग्रस्थान अधिक भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 2022 च्या अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत अलकॅरेझने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुडचा पराभव करत जेतेपद मिळविले. तसेच त्याने एटीपीच्या मानांकनात अग्रस्थानावर झेप घेतली. या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या नदालला तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्या दहा टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविता आलेले नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत 19 वर्षीय अलकॅरेझने विजेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव केला होता. नॉर्वेच्या कास्पर रुडने एकेरीची तिसरी फेरी गाठताना इव्हाशेकाचा 6-2, 6-3 असा फडशा पाडला. अन्य एका सामन्यात अमेरिकेचा नववा मानांकित टेलर फ्रिजने इमिलोनेव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. फ्रिजचा पुढील फेरीतील सामना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हशी होणार आहे. शेपोव्हॅलोव्हने दुसऱ्या फेरीतील सामन्यात पेलाचा पराभव केला होता.
महिलांच्या विभागात बिनाका अँड्रेस्क्यूने दुसऱ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या मारिया सॅकेरीचा 5-7, 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अँड्रेस्क्यूने 2019 साली अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. अँड्रेस्क्यूचा तिसऱ्या फेरीतील सामना सोफिया किनेनशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात साबालेन्काने रॉजर्सचा 6-3, 6-4, 6-3 असा पराभव केला. साबालेन्काचा पुढील फेरीतील सामना बोझकोव्हाशी होणार आहे. सोरेना सिरेस्टीने गार्सियावर 6-2, 6-3 अशी मात करत पुढील फेरी गाठली. सिरेस्टीचा पुढील फेरीतील सामना मुचोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात ग्रेचेव्हाने जेबॉरचा 6-2, 6-2, जेनिक सिनेरने डेरेचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.