उचगाव कुस्ती मैदान : संगमेश, निखील यांचे प्रेक्षणीय विजय
एन. ओ. चौगुले/उमेश मजुकर /उचगाव/बेळगाव
उचगाव येथील हनुमान कुस्तीवीर संघ आयोजित भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने अली इराणी याला 13 व्या मिनिटाला एकेरीचा हाताचा कस चढवून अस्मान दाखवित उपस्थित 23 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. सायंकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पहिल्या क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय चॅम्पियन अली इराणी व महाराष्ट्राचा उगवता तारा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ही कुस्ती आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, युवराज कदम व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला महेंद्र गायकवाडने पायाला चाट मारून अली इराणीला खाली घेत चित करण्याचा प्रयत्न केला पण बलदंड शरीराच्या अलीने त्यातून सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला इराणीने दोन्ही हाताचे हप्ते भरून महेंद्रला चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण महेंद्रने सावधगतीने त्यातून सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला महेंद्रने एकेरी पट काढून अलीवर कब्जा मिळवत एकेरी हाताचा कस चढवण्याचा प्रयत्न केला पण त्यातून पुन्हा अलीने सुटका करून घेतली. नवव्या मिनिटाला अलीने एकेरी पड काढत पायाला अकडी लावून महेंद्रला खाली घेतले. पण महेंद्रने खालून डंकी मारून त्यातून सुटका करून घेतली. 13 व्या मिनिटाला महेंद्रने एकेरी पट काढत अली इराणीला खाली घेत एकेरी हाताचा कस चढून अस्मान दाखवित उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पाटील यांचा पट्टा मनीष रायते पुणे व कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार ही कुस्ती आर. एम. चौगुले, चेतन पाटील, व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला मनीष रायतेने एकेरी पट काढून संगमेशला खाली घेत एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून संगमेशने सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला मनीषने दुहेरी पट काढून संगमेशला खाली घेत झोळी बांधून चित करण्याचा प्रयत्न करत असताना संगमेश बिराजदारने खालून डंकी मारत डंकी डावावर चित करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्तीत बेळगावचा उगवता मल्ल निखील गणेशपूरने कीर्तीकुमार कारवेला चौथ्या मिनिटाला मोळी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व प्रकाश इंगळगे ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत दयानंद घटप्रभाने कामेश पाटील कंग्राळीचा एकलांगी डावावर विजय मिळवला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्ती पवन चिकदिनकोप व रोहित पाटील कंग्राळी ही कुस्ती 15 मिनिटे डाव-प्रतिडावाने झुंजली पण ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत बाळू शिंदी कुरबेटने सुशांत कंग्राळीचा लपेट डावावरती विजय मिळवला. आठव्या क्रमांकाच्या कुस्ती निरंजन येळ्ळूरने महांतेश कोल्हापूरचा डाक डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्ती प्रवीण निलजीने राकेश कोल्हापूरचा एकचाक डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्ती संकल्प कंग्राळीने पंकज चापगावचा लपेट डावावरती पराभव केला. राजू डागेकर, वैष्णव कुद्रेमनी, करण खादरवाडी, वैभव सांबरा, नंदकुमार संतिबस्तवाड, ओमकार मुतगा, कुणाल अवचारहट्टी, मंथन सांबरा आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. कंग्राळीच्या पार्थ पाटीलने पांडुरंग स्पोर्टस हॉस्टेल याचा घुटणा डावावर, प्रणव उचगावने रोहन कावळेवाडीचा घिशा डावावर, आकाश उचगावने गोकुळ वडगावचा, घुटणा डावावर, तर गणपत शिंदोळीने सुरज उचगावचा मोळी डावावरती पराभव करून प्रेक्षणीय विजय मिळवले.
कुस्ती मैदानाचे उद्घाटन आकाश हुक्केरीकर, गणपतराव पावले, परशराम चौगुले, शंकर गिरी, विष्णू जाधव, वामन कदम, दयानंद जाधव, सातेरी कोवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान प्रतिमेचे पूजन बी. एस. होनगेकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आखाड्याचे पंच म्हणून महेश डुकरे, सुधीर बिर्जे, कृष्णा पाटील कंग्राळी, काशिराम पाटील, चेतन बुद्धण्णावर, चेतन पाटील, गणपत बन्नोसी, राजू कडोली, नवीन मुतगे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन सुकुमार माळी इचलकरंजी व एन. ओ. चौगुले यांनी केले. कागलच्या कृष्णा गोले यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या हलगीच्या वाद्यावर कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.