नवी दिल्ली
अलिबाबा समूहाने पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनमधील आपला 3.1 टक्के इतका मोठा हिस्सा विकला आहे. उपलब्ध माहितीनुसार अलिबाबा समूहाची कंपनी अँट फायनान्शिअलने पेटीएमचे 125 दशलक्ष डॉलर्सचे समभाग म्हणजेच 1,125 कोटी रुपयांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे. अँट फायनान्शियलने भारतीय डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमचे 2 कोटी समभाग 536.95 रुपये प्रति समभाग दराने विकले आहेत.
या अगोदर सप्टेंबर 2022 मध्ये पेटीएममध्ये अलिबाबा समूहाचा 6.26 टक्के हिस्सा होता. अलिबाबाच्या समभाग विक्रीमुळे गुरुवारी पेटीएमच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. पेटीएमचे समभाग 6.16 टक्के किंवा 35.65 रुपयांनी घसरुन 543.50 रुपयावर बंद झाले आहेत.
वर्षात पेटीएमच्या समभागात 500 रुपयांची घसरण
पेटीएमचा 52 आठवडय़ांचा उच्चांक 1,145.90 रुपये आहे, तर 52 आठवडय़ांचा नीचांक 438.35 रुपये आहे. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या समभागाने नीचांकी पातळी गाठली होती. यामुळे जवळपास वर्षभरात 500 रुपयांनी पेटीएमचे समभाग प्रभावीत झाले
आहेत.