ब्रह्मोस एरोस्पेससोबत 20 हजार कोटींचा करार दृष्टिपथात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदल लवकरच ब्रह्मोस एरोस्पेससोबत 20 हजार कोटी रुपयांचा करार करणार आहे. या कंपनीकडून नौदल 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. बहुतेक स्वदेशी सामग्री असलेली ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या सर्व आघाडीच्या युद्धनौकांवर तैनात केली जातील. ब्रह्मोस एरोस्पेस हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीने नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. या क्षेपणास्त्रावर स्वदेशी यंत्रणाच तैनात केल्या जाणार आहेत. 200 हून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा नौदलाचा प्रस्ताव सध्या प्राथमिक अवस्थेत असून संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीने आपल्या क्षेपणास्त्राची रेंज 290 किमीवरून 400 किमीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर क्षेपणास्त्र प्रणाली खूप वेगाने विकसित झाली आहे. क्षेपणास्त्रात भारतीय सामग्रीही वाढवण्यात आली आहे. क्षेपणास्त्रांमध्ये भारतीय उद्योग आणि उत्पादकांचा सहभाग अधिक व्हावा म्हणून त्यातील अनेक यंत्रणा अपग्रेड करून स्वदेशी बनवण्यात आल्या आहेत