वृत्तसंस्था/ लखनौ
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लीगमध्ये यश मिळविण्यासाठी यूपी वॉरियर्सने जोरदार प्रयत्न सुरू केले असून या संघाच्या कर्णधारपदी या प्रँचायजीने ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज फलंदाज ऍलीसा हिली हिची निवड केली आहे.
मार्च 2023 मध्ये होणाऱया पहिल्या डब्ल्यूपीएलमध्ये एकूण पाच संघ सहभागी होत असून यूपी वॉरियर्स हा त्यापैकी एक आहे. या संघाने आपल्या ताफ्यात डायनॅमिक व समतोल साधणाऱया खेळाडूंना सामील करून घेतले आहे. 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात त्यांनी सहा विदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेतले आहे. त्यात ऍलीसा हिलीचाही समावेश आहे. हिली ही एक अनुभवी खेळाडू असून ऑस्ट्रेलियासाठी तिने आतापर्यंत 139 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिने सुमारे 2500 धावा केल्या असून त्यात एक शतक व 14 अर्धशतकांचा समावेश आहे. महिला क्रिकेटमधील ती एक उत्कृष्ट फलंदाज यष्टिरक्षक असल्याचे मानले जाते. तिने यष्टीमागे टी-20 प्रकारात 110 बळी टिपले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघातील ती एक महत्त्वाची सदस्य असून मोठय़ा स्टेजवर सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची तिची खासियत आहे. 2020 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने सर्वोत्तम खेळ करीत संघाला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिले होते आणि तिलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. महिला टी-20 क्रिकेटमध्ये तिने सर्वाधिक धावांच्या खेळीचा विक्रम नोंदवला असून लंकेविरुद्ध तिने 61 चेंडूत नाबाद 148 धावा झोडपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा टी-20 विश्वचषक जिंकला आणि या प्रत्येक संघात तिचा समावेश होता. याशिवाय आस्ट्रेलियाने महिलांचा वनडे विश्वचषक दोनदा जिंकला असून त्या संघांतही हिलीचा समावेश होता. 2018 मध्ये तिला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम टी-20 महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.
‘यूपी वॉरियर्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळतेय, याचा मला खूप आनंद वाटतोय. आपला संघ एक मजबूत संघ असून आपला ठसा उमटवण्यासाठी हा संघ आतुर झाला आहे. या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण असून यशस्वी होण्याची क्षमता या संघात आहे. आम्ही जिंकण्यासाठीच येथे खेळणार आहोत,’ अशा भावना हिलीने व्यक्त केल्या. महिला प्रिमियर लीग 4 ते 26 मार्च या कालावधीत खेळविले जाणार असून मुंबईतील दोन स्टेडियम्सवर यातील एकूण 22 सामने खेळविले जातील. यूपी वॉरियर्सचा पहिला सामना 5 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.
यूपी वॉरियर्स महिला संघ ः ऍलीसा हिली (कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा, शबनिम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्शवी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस. यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.