अमेलिया केर : 3 बळी व नाबाद 31
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ‘सामनावीर’ अॅमेलिया केरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 4 गड्यांनी पराभव करत पुन्हा स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान पटकावले. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या अॅमेलि केरने गोलंदाजी 22 धावात 3 तर फलंदाजीत 4 चौकारासह नाबाद 31 धावा झळकवल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 9 बाद 125 धावा जमवल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 16.3 षटकात 6 बाद 129 धावा जमवत विजय नोंदवला.
बेंगळूरच्या डावामध्ये कर्णधार स्मृती मानधनाने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24, इलेसी पेरीने 38 चेंडूत 3 चौकारासह 29, नाईटने 13 चेंडूत 1 चौकारासह 12, अहुजाने 13 चेंडूत 1 चौकारासह 12, रिचा घोषने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 29 श्रेयांका पाटीलने 1 चौकारासह 4 धावा जमवल्या. सोफी डिव्हाईनला आपले खाते उघडता आले नाही. बेंगळूरच्या डावामध्ये 1 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे अॅमेलिया केरने 22 धावात 3, नॅट स्किव्हेर ब्रंटने 24 धावात 2, वांगने 26 धावात 2 तर इशाकने 31 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला. या जोडीने 6 षटकात 53 धावांची भागीदारी केली. श्रेयांका पाटीलने भाटियाला मानधनाकरवी झेलबाद केले. तिने 26 चेंडूत 6 चौकारासह 30 धावा जमवल्या. स्कूटने मॅथ्यूजला झेलबाद केले. तिने 17 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 24 धावा जमवल्या. शोभना आशाने नॅट स्किव्हेरला बाद केले. तिने 7 चेंडुत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमवल्या. कर्णधार हरमनप्रित कौर पेरीच्या गोलंदाजीवर केवळ 2 धावा जमवत त्रिफळाचित झाली. पूजा वस्त्रकरने 18 चेंडूत 2 चौकारासह 19 धावा जमवल्या. अॅमेलिया केरने कौरला साथीला घेत विजयाचे सोपस्कार 16 व्या षटकात पूर्ण केले. केरने 27 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 31 धावा जमवल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. बेंगळूरतर्फे कनिका अहुजाने 5 धावात 2 तर स्कूट, श्रेयांका पाटील, पेरी, शोभना आशा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या स्पर्धेत अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून मिळालेले 126 धावांचे आव्हान 11.3 षटकात गाठणे जरुरीचे होते पण ते त्यांना शक्य झाले नाही. मुंबई इंडियन्सने हे आव्हान हे पार केले असते तर त्यांना दिल्ली कॅपिटलपेक्षा आपला रनरेट अधिक चांगला राखता आला असता. मात्र या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी या स्पर्धेत 8 पैकी 6 सामने गमवले. दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात मंगळवारी लिग स्पर्धेतील शेवटचा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यानंतर या स्पर्धेच्या गुणतक्त्यातील संघांचे स्थान निश्चित होईल. या गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवणाऱ्या संघाला येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी थेट प्रवेश मिळेल. शुक्रवारी होणाऱ्या एलिमिनेटर लढत दुसऱ्या तिसऱ्या स्थानावरील संघात होईल. या सामन्यातील विजयी संघ रविवारच्या सामन्यात जेतेपदासाठी लढत देईल. संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 9 बाद 125 (स्मृती मानधना 24, इलेसी पेरी 29, नाईट 12, अहुजा 12, रिचा घोष 29, पाटील 4, स्कूट 2, शोभना आशा नाबाद 4, कसाट 2, अॅमेलिया केर 3-22, वांग 2-26, नॅट स्किव्हेर ब्रंट 2-24, इशाक 1-31), मुंबई इंडियन्स 16.3 षटकात 6 बाद 129 (मॅथ्यूज 24, यास्तिका भाटिया 30, नॅट स्किव्हेर 13, हरमनप्रित कौर 2, अॅमेलिया केर नाबाद 31, वस्त्रकर 19, वाँग 0, अमनज्योत कौर नाबाद 0, अहुजा 2-5, स्कूट 1-19, पाटील 1-26, पेरी 1-18, शोभना आशा 1-24).