अनेक शहरात उणे 45 अंश तापमान ः 20 कोटी लोकांना फटका
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
हिमवादळाने अमेरिकेत हाहाकार निर्माण झाला असून सुमारे 20 कोटी लोक चक्रीवादळ बॉम्बच्या तडाख्यात सापडले आहेत. या तडाख्यात आतापर्यंत 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रचंड थंडीमुळे बहुतांश भागात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील मोंटाना शहरात तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. घटनेचे गांभीर्य पाहून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
अमेरिकेतील 60 टक्के लोकसंख्या या हिमवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. या वादळामुळे शुक्रवारी 5,200 विमानोड्डाणे रद्द करण्यात आली होती. शनिवारी आणखीही काही फेऱया बंद करण्यात आल्या. सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळासह काही विमानतळांनी धावपट्टी बंद केली. हजारो लोक विमानतळांवर अडकून पडले आहेत. चार लाखांहून अधिक घरांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. लोकांना अंधारात वावरावे लागत आहे. अमेरिकेपासून कॅनडातील क्मयूबेकपर्यंत हे चक्रीवादळ 3,200 किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या वादळामुळे 15 लाख लोकांच्या घरांची वीज गेली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, वादळाच्या वेळी वातावरणात वेगाने दाब कमी झाल्यास ‘बॉम्ब चक्रीवादळ’ तयार होतात. मोठय़ा तलावांजवळ याचा सर्वाधिक धोका असतो. पाण्याच्या ठिकाणी बर्फाच्या वादळांसाठी चांगली परिस्थिती निर्माण होते. आठवडय़ाच्या शेवटी शहरात दोन ते चार फूट बर्फ पडू शकतो, असा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे.
अमेरिका तीव्र थंडीच्या लाटेत सापडली आहे. देशाच्या अनेक भागात बर्फवृष्टीसह हिमवादळ तीव्र झाले आहे. हिमवादळाचे वारे 65 मैल प्रतितास (105 किमी प्रतितास) पर्यंत असण्याचा अंदाज आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पोर्टलँड, ओरेगॉनमध्ये आपत्कालीन निवारे उघडण्यात आले आहेत. फिलाडेल्फियामध्ये शुक्रवारपासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. काही जिल्हय़ांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
ख्रिसमस आनंदोत्सवावर विरजण
चक्रीवादळ बॉम्बने अमेरिका आणि कॅनडातील अनेक लोकांचा ख्रिसमसचा आनंद हिरावला आहे. लोकांनी ख्रिसमसच्या सुट्टीत नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास योजना रद्द केल्या आहेत. अनेकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. यासंबंधी बोलताना एका अमेरिकनाने सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ‘मला मिशिगनमध्ये माझ्या कुटुंबासोबत ख्रिसमस घालवायचा आहे, पण आता मी इथे अडकलो आहे. माझे कुटुंबीय मला वारंवार फोन करत आहेत, पण मी सुरक्षित राहावे अशी त्यांची इच्छा आहे,’ असे नेशविलच्या विमानतळावर अडकलेल्या एका प्रवाशाने सांगितले.