भारताचा मुरली श्रीशंकर सातव्या तर पारुल चौधरी बाराव्या स्थानी
वृत्तसंस्था/ युगेनी (अमेरिका)
येथे सुरु असलेल्या विश्व ऍथलेटिक्स संघटनेच्या विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी अमेरिकेच्या पुरुष धावपटूंनी 100 मी. धावण्याच्या शर्यतीत मक्तेदारी राखताना तिन्ही पदके मिळविली. भारताच्या मुरली श्रीशंकरला पुरुषांच्या लांबउडीत सातव्या तर पारुल चौधरीला 3000 मी. स्टिपलचेसमध्ये बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शनिवारी या स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या क्रीडाप्रकाराकडे शौकिनांचे अधिक लक्ष केंद्रीत झाले होते. विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेच्या 31 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच अमेरिकेच्या धावपटूंनी आपली मक्तेदारी प्रस्थापित करत तिन्ही पदके पटकाविली. या क्रीडाप्रकारात अमेरिकेच्या प्रेड केर्लीने 9.86 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. मेरव्हिन ब्रेसीने रौप्यपदक तर ट्रेव्होन ब्रोमेलने कांस्यपदक मिळविले. केर्लीने आपल्या देशाच्या ब्रेसी आणि ब्रोमेल यांना 0.002 सेकंदाने मागे टाकले. 1991 साली टोकियोमध्ये झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या धावपटूंनी मक्तेदारी राखताना अनुक्रमे कार्ल लेव्हिसने सुवर्ण, ब्युरेलने रौप्य आणि डेनिस मिचेलने कांस्य पदक मिळविले होते. या घटनेनंतर अमेरिकेच्या पुरुष धावपटूंनी विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत तब्बल 31 वर्षांनंतर 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तिन्ही पदके मिळविली. 2008 पासून जमैकाचा जगातील वेगवान धावपटू युसेन बोल्टने तब्बल 10 वर्षांच्या कारकीर्दीत आपली मक्तेदारी राखली होती. टेक्सासचा 27 वर्षीय केर्ली या वर्षात 100 मी.मध्ये 9.8 सेकंदाचा अवधी नोंदविणारा एकमेव धावपटू आहे. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत इटालीयन मार्सेल जेकॉब्जने पहिले स्थान तर केर्लीने दुसरे स्थान पटकाविले होते.
या स्पर्धेत शनिवारी महिलांच्या गोळाफेक या क्रीडाप्रकारात अमेरिकेच्या चेस ईलेने सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या लांबउडीत चीनच्या वेंग जियानेनने सुवर्ण तसेच महिलांच्या 10000 मी. धावण्याच्या शर्यतीत इथिओपियाच्या गिडेने सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या लांबउडीमध्ये चीनच्या जियानेनने सुवर्णपदक मिळविले पण या क्रीडाप्रकारात भारताचा मुरली श्रीशंकर याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 7.96 मी. चे अंतर नोंदविले. अंतिम फेरीत मुरली श्रीशंकरकडून चांगली कामगिरी होऊ शकली नाही. चीनच्या जियानेनने 8.36 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक, ग्रीसचा टेंटोग्लोयुने 8.30 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक, स्विसच्या इहामेरने 8.16 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. टेंटोग्लोयु हा टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे.
महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये भारताची धावपटू पारुल चौधरीला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडाप्रकारात फ्रान्सच्या ऍलिसी फिनॉटने सुवर्णपदक पटकाविले.