कर्ज कालावधी 2 वर्षांनी वाढणार : रिपब्लिकन पार्टीकडून काही अटी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेवरील आर्थिक संकट तूर्तास टळले आहे. अध्यक्ष जो बिडेन अणि रिपब्लिकन पार्टीशी संबंधित स्पीकर केविन मॅक्कार्थी यांच्यात 2 वर्षांसाठी कर्ज उचल कालावधी वाढविण्यावर सहमती झाली आहे. यादरम्यान शासकीय खर्चांमध्ये कपात केली जाणार आहे. यासंबंधीच्या करारासोबत प्रशासनाने कर्ज घेण्याची मर्यादा वाढत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत कुठलीच अडचण होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.
अमेरिकेत सध्या कर्जाची मर्यादा 31.4 ट्रिलियन डॉलर्स आहे. करार अंतिम झाल्यावर बुधवारी अमेरिकेच्या संसदेत यावर मतदान होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी करारासाठी बिडेन आणि मॅक्कार्थी यांच्यादरम्यान सुमारे 90 मिनिटांपर्यंत फोनवरून चर्चा झाली होती.
आम्ही एक ऐतिहासिक करार केला असून यामुळे सरकारच्या खर्चांमध्ये कपात होईल आणि अमेरिकेच्या जनतेला गरीबीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच सरकारच्या मनमानीला आळा बसून जनतेवर कुठलाच नवा कर लादला जणार नसल्याचा दावा मॅक्कार्थी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रझेंटेटिव्हज म्हणजेच कनिष्ठ सभागृहात बिडेन यांच्या पक्षाला बहुमत नाही. तर रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी बिडेन प्रशासनाने खर्चात कपात केली तरच कर्ज वाढविण्यास समर्थन करू अशी भूमिका घेतली होती. बिडेन यांनी स्वत:च्या आरोग्य, हवामान बदल आणि सामाजिक कार्यक्रम यासारख्या योजनांमध्ये 14 टक्क्यांची कपात करण्याची तयारी दर्शविली तर कर्जाची मर्यादा वाढवू असा प्रस्ताव रिपब्लिकन पार्टीने एप्रिलमध्ये संमत केला होता. रिपब्लिकन पार्टी सातत्याने अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून डेमोक्रेटीक पार्टीला लक्ष्य करत आहे.
अमेरिकेत प्रशासनाकरता कर्ज उचल करण्याची एक मर्यादा निश्चित असते. मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाला कॅशलेस होण्यापासून वाचविण्यासाठी हे मर्यादा अनेकदा वाढविण्यात आली आहे. अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट अत्यंत अधिक आहे.